यंदा ऊस उत्पादन घटण्याची शक्यता : पाऊस लांबल्याचा परिणाम
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे पुढील हंगामात ऊसाचे उत्पादन घटनाची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे ३० ते ४०% ऊस उत्पादन घटणार असल्याने, साखर कारखान्या पुढे ऊसाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तब्बल दीड महिना पाऊस लांबण्याचा परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर होणार आहे. तसेच आज अखेर सांगली जिल्ह्यात अवघा १०० हेक्टर रोज उसाची आडसाली लावण झाली आहे. गेल्या एक महिन्यानंतर सांगली जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अजून खरीप पिकांना अपेक्षित असा पाऊस सुरू झालेला नाही. ऊस पिकांसाठी अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी यंदा ऊस पिकांची वाढ झालेली नाही. यंदा एप्रिल, मे व जून महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे नद्या तसेच विहिरीचे पाणी आटले होते. त्यामुळे ऊस पिकाला पाणीपुरवठा कमी प्रमाणात झाला आहे. ऊसाची वाढ झाली नाही. त्यामुळे उसाचे ३० ते ४०% उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी पुढील वर्षाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना ऊसाचा तुटवडा भासण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात सुमारे एक लाख ८८ हजार ९० हेक्टर क्षेत्रावरती ऊस लावण केली आहे. हा ऊस यंदाच्या गळीत हंगामासाठी उपलब्ध असणारा आहे. यंदा ऊसाच्या लागवडीसाठी सर्वसाधारण एक लाख ८६ हजार २१५ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र आतापर्यंत केवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर अडसाली लावण झाली आहे.

केवळ ४०% खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. जुलैचा पहिला आठवडा लोटला तरी, पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५ ते ४०% एवढ्याच खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात खरीपाच्या सुमारे ९०% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.