राज्याच्या ” दैवताला ” त्यांच्याच राज्यात जागा नाही ?
बांबवडे : महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला त्यांच्याच भूमीत जागा मिळू नये, यासारखे दुर्दैव नाही. ज्या कोणी मंडळीनी हि प्रतिष्ठापना परवानगी शिवाय केली, हे निश्चितच चुकीचे आहे. परंतु त्याच राजांना , त्यांच्याच कर्मभूमीतून बाहेर काढणे, हेसुद्धा अशोभनीय आहे. हे सर्व घडलंय शाहुवाडी तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या बांबवडे गावात. ज्या गावाला सुमारे ५० ते ६० वाड्या-वस्त्या जोडल्या आहेत. जे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी असलेले पन्हाळगड आणि विशाळगड यांच्या मधोमध आहे. एकंदरीत काय घडलेली हि घटना आणि कारवाई अनेक शिवप्रेमींच्या जिव्हारी लागली आहे.
इथं काही शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा राजांनीच शिकवलेल्या गनिमी काव्याने प्रतिष्ठापीत केला . परंतु त्यांचा गनिमी कावा काहीसा कमी पडला. आणि राजांचा पुतळा प्रशासनाकडून हटविण्यात आला. या भागाच्या सीमांवर पोलीस बंदोबस्त ठाण मांडून आहे. काही ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाची गाडीसुद्धा तैनात आहे. थोड्यावेळासाठी असे वाटले कि, आमच्याकडे अतिरेकी आलेत कि, काय? असा रंग या प्रकरणाला चढताना दिसत आहे.
मुळात काय पोलीस प्रशासन हाकेच्या अंतरावर असताना , हे घडतेच कसे? , प्रशासनाची हि चूक लपवण्यासाठी अनेकांच्या भावनांना दिलेली हि तिलांजली नव्हे काय ? हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. आज प्रशासनाने बांबवडे गावाला पोलीस छावणी चे रूप दिले आहे. वाटेत दंगल नियंत्रण पथकाची वर्णी लावली आहे. या सर्व गोष्टींकडे लोकप्रतिनिधी कसे पहात आहेत, हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.

एकीकडे शिवसेनेचे ठाकरे सरकार आहे, जे १९६८ सालच्या अगोदर पासून छत्रपतींच्या नावावर समाजकारणासहित राजकारण करीत आहेत. आज त्यांच्याच राज्यात हि घटना घडत आहे, हि बाब द्विधा अवस्था निर्माण करणारी आहे. ज्या छत्रपतींनी आपल्या अनेक पिढ्या हा महाराष्ट्र घडविण्यासाठी खर्ची घातल्या, त्यांना मिळत असलेली हि वागणूक कितपत योग्य आहे. शिवसेनेने यावर काय भूमिका मांडली आहे ? सेनेचे माजी आमदार म्हणतात कि, आम्ही पुतळा हटवू देणार नाही. मग असे असताना पुतळा कसा काय हटवला गेला ? कि ते विधान तत्कालीनच होते. म्हणजे सेनेची भूमिका दुटप्पी आहे असे म्हणण्यास जागा आहे. केवळ राजांच्या नावावर सेना आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात वावगे ते काय असावे ?
एकतर चूक प्रशासनाची आहे.कि, त्यांच्या दुर्लक्षामुळे हि घटना घडली. हि चूक सावरण्यासाठी प्रशासनाने अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्याचे काय? चूक तुमची आणि शिक्षा शिवप्रेमींना होणे हे कितपत योग्य आहे.
यावेळी जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर चित्र निश्चितच वेगळे पाहायला मिळाले असते. अहो, कर्नाटक राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याची पुनर्प्रतिष्ठापना होते, तर महाराष्ट्रात का नाही? यासाठी त्या मनोवृत्तीचे धैर्य असावे लागते. साहेबांनी बाबरी पडल्याचा आरोप बहुमानाने स्वीकारला होता, याचा विसर, कदाचित या सेनेच्या सरकार ला पडला असेल.
एकंदरीत काय आहे त्या जागेवर किंवा आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी सहित बसविणे, अशी अनेक शिवप्रेमींची भावना आहे. या भावनेला सेनेचे राज्य आणि त्यांचेच असलेले प्रशासन काय न्याय देते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.