विक्रीसाठी बसणाऱ्या शेतकरी वर्गाकडून ठेकेदारांची जबरदस्तीने वसुली-पंचायत समितीस निवेदन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आठवडी बाजारासह शुक्रवार ते बुधवार , ग्रामपंचायत कराच्या व्यतिरिक्त जादा रकमेची वसुली ठेकेदार करीत असतात. अशा ठेकेदारांकडून ठेका काढून घेण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी पंचायत समिती कडे देण्यात आले असून, यावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे.

बांबवडे ग्रामपंचायत च्या वतीने प्रति वर्षी पाटी-बुटी, जनावरांच्या खरेदी-विक्री चा ठराविक कर मिळण्यासाठी निविदेच्या स्वरुपात ठेका दिला जातो. परंतु सध्या प्रति गुरुवारी जो आठवडी बाजार असतो, त्या बाजारात शेतकरी आपला भाजीपाला तसेच इतर वस्तू विकण्यासाठी येतात. त्यावेळी विक्रीस बसण्यासाठी विक्रेत्यांकडून १०/- तसेच २०/- रुपये कर नियमानुसार घेणे बंधनकारक असते. परंतु सध्या जे ठेकेदार आहेत, ते नियमानुसार कर न घेता, सुमारे ५० ते १०० रुपयांपर्यंत वसूल करीत असतात. त्यामुळे येथील शेतकरी लुबाडला जात असून, जबरदस्तीने वसुली केली जात आहे. हि वसुली गुरुवारी असतेच , त्याचबरोबर शुक्रवार ते बुधवार चा ठेका सुद्धा दिला जातो. यावेळी सुद्धा जबरदस्तीने वसुली केली जात असते. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अशा नियमबाह्य वसुलीस त्वरित आळा बसावा, व संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द व्हावा, अशा आशयाचे निवेदन पंचायत समितीस देण्यात आले आहे.