विचारवंतांच्या ” ठिणगी ” ची परिपूर्णता म्हणजे डॉ. डी. आर. पाटील सर
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात शोधक आणि वैशिष्ट्यपूर्ण बातमी लिहिणारं एक व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक बातमीतील प्रत्येक वाक्याला अर्थपूर्ण करणारं हे व्यक्तिमत्व, आत्ता डॉक्टर म्हणून परिचित होणार, आम्हा पत्रकारांसाठी हि अभिमानास्पद बाब आहे. कारण एका अभ्यासू व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्यासारखे वाटत आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे ” डॉ. डी. आर. पाटील सर ” .

डी. आर. सरांनी दैनिक लोकसत्ता पासून पत्रकारिता सुरु केली. अगदी पहिल्यापासून हे व्यक्तिमत्व अभ्यासू, आणि मितभाषी. पण ज्यावेळी बोलेल त्यावेळी मात्र निश्चित समोरच्याला विचार करायला लावेल, यात शंका नाही. डी. आर. पाटील यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथून इतिहास विषयात पी.एच.डी. पदवी मिळवली. सरांना मिळालेली पी.एच.डी. पदवी आमच्यासारख्यांसाठी अभिमानाची आहे. आमचा प्रत्येक पत्रकार अभ्यासू आहे. परंतु प्रत्येकालाच सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. ज्यांना मिळते,त्यांना त्याचं सोनं करता येईलच,असं नाही. परंतु आमच्या डी.आर. सरांनी मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलं, आणि आमचा एक पत्रकार डॉक्टर झाला, केवढी अभिमानाची बाब आहे.

सरांनी मिळवलेल्या पदवीला कष्टाची झालर आहे, तर त्यागाची सोनेरी किनार आहे. एक काळ असा होता, केवळ पाचशे रुपये महिन्याला मिळवूनही आनंदी राहणारं हे व्यक्तिमत्व आम्ही जवळून पाहिलं आहे. त्यांच्या हृदयाच्या कप्प्यात अनेक अडचणींचे डोंगर आपल्याला पहायला मिळतील, पण ते स्वत: कधी दाखवणार नाहीत. अनेक कष्टातून पुढे गेलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे ठिणगीतून निघालेला लाव्हारस आहे. या ठिणगी ने शाहुवाडी तालुक्याला पुन्हा एकदा विचारवंतांची आठवण करून दिली आहे. कष्टाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं , हे सोनं खऱ्या अर्थाने ” विजयादशमी ” चं सोनं आहे.

सरांबाबत लिहावं तितकं थोडं आहे. कमी वयात विचारांची हिमालयाची उंची गाठलेलं हे व्यक्तिमत्व, आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करीत राहो, हि ईश्वर चरणी प्रार्थना, डॉ. डी. आर. पाटील सरांना सह्याद्रीच्या कुशीकडून अनंत शुभेच्छा आणि त्यांचं साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने अभिनंदन.