शिक्षक दोन, वर्ग चार तर शिक्षक मागणी – कन्या विद्यामंदिर मलकापूर ची दुरावस्था
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथील कन्या विद्यामंदिर शाळेची दुरावस्था झाली आहे. तसेच शाळेसाठी दोन शिक्षकांची मागणी येथील पालकवर्गातून होत आहे.

मलकापूर येथील कन्या विद्या मंदिर या शाळेची स्थापना दि. १ नोव्हेंबर १८८४ रोजी झाली होती. या शाळेच्या इमारतीला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे हि शाळा इमारत धोकादायक झाली असल्याचे शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. या शाळेत पहिली ते चौथी चे वर्ग भरत आहेत. शाळा इमारत धोकादायक झाली असल्याने, नगर परिषदेच्या इमारतीमध्ये सध्या विद्यार्थीनी बसवल्या जात आहेत.

याठिकाणी असलेल्या खोल्या विद्यार्थिनी संख्येच्या अनुषंगाने लहान आहेत. शाहुवाडी तालुका दुर्गम आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. ज्याठिकाणी विद्यार्थी बसतात, तिथे पावसाचे पाणी वर्गात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. सदरच्या परिस्थितीबाबत गटशिक्षणाधिकारी यांना वारंवार सांगितले असूनही, याबाबत मार्ग निघत नाही.


सध्या शाळेत शिक्षक दोन आणि वर्ग चार अशी अवस्था आहे. दोन शिक्षक चार वर्गांचा भार पेलण्यास असमर्थ ठरत आहेत. तेंव्हा लवकरात लवकर या कन्या विद्यामंदिर साठी दोन शिक्षकांची त्वरित व्यवस्था व्हावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी महेंद्र शिंदे, अजय गुरव, सुलभा तांदळे, मयुरी गुजर, अमेय भिंगार्डे, चेतन गुजर, परेश नागवेकर आदी पालकवर्ग उपस्थित होते.