….समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे : सौ. वेदांतिका माने ताईसाहेब
बांबवडे : प्रत्येक सामाजिक गोष्टीसाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा काही गोष्टींची सुरुवात स्वत:पासून करावी. नेमकं हेच आपल्या कृतीतून दाखवून दिलंय, ते सौ.वेदांतिका धैर्यशील माने ( ताई साहेब ) यांनी. शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण येथील हि घटना आहे. इथं दोन्ही सख्ख्या भावांना एका दुर्धर आजाराने ग्रासले असून, त्यांच्या बेताच्या परिस्थितीत हा आजर त्यांच्या घरी फार मोठ संकट बनून, ठांण मांडून आहे. अशावेळी सौ वेदांतिका माने ताई साहेब यांनी स्वत:कडून काही जीवनावश्यक वस्तुंचं कीट या कुटुंबाला तात्पुरती मदत म्हणून दिलं आहे, तर यापुढे जावून या कुटुंबाला आर्थिक मदत कशी मिळेल, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात अशी दुर्दैवी घटना म्हणजे, ‘संकष्टीच्या घरी एकादशी येणं ‘ असं झालं आहे. समाजात या माउलींनी आपल्या स्वकर्तुत्वातून सामाजिक बांधिलकीचा नवा इतिहास लिहिण्याचा स्वत:पासून श्रीगणेशा केला आहे.
शित्तूर-वारुण येथील शिवाजी पाटील यांचं कुटुंब म्हणजे हातावर पोट भरणारं कुटुंब. शिवाजी पाटील व त्यांची पत्नी तुटपुंजा शेतीवर आणि मोलमजुरी करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहे. सध्या कोरोना संक्रमणाचा काळ आहे, त्यामुळे मोलमजुरी देखील बंद आहे. अशा कठीण प्रसंगात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले असतानाच, त्यांच्या निखील व कुणाल या दोन शाळकरी भावंडांना मायोपॅथी सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. यामुळे या दोन्ही मुलांना अचानक अपंगत्व आलं आहे. या घटनेला आमचे मित्र दै.सकाळ चे प्रतिनिधी शाम पाटील व त्यांच्या शैक्षणिक व्यासपीठ या संस्थेने समाजासमोर आणले. हि बातमी समाजासह सौ. वेदांतिका माने यांनी देखील वाचली. आणि या माउलीने केवळ वाचून न थांबता, त्यांच्या कुटुंबाला सहकार्य म्हणून, जीवनावश्यक सामानाचे कीट, तसेच इतर अनेक वस्तू या कुटुंबापर्यंत सागर माने अमर पाटील व त्यांचे सहकारी यांच्याकडून पोहोचविल्या. याही पुढे जावून शासकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे. कारण त्या, शिवसेनेचा पश्चिम महाराष्ट्रातील बुलंद आवाज असणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी आहेत. तरीदेखील त्यांनी या घटनेचा बोभाटा न करता मोजक्या मंडळींच्या हस्ते हि मदत पोहचविली आहे.
सध्याच्या बदलत्या राजकीय आणि समाजकारणाला हि घटना कलाटणी देणारी ठरत आहे. त्याचबरोबर या दोन्ही भावंडांना जगण्याची नवी उमेद देणारी ठरत आहे. आज समाजात अशा अनेक घटना घडत असतात, परंतु सध्या सामाजिक भावना बोथट झाल्याचे आपण पाहतो.
परंतु सौ. वेदांतिका माने आणि त्यांचे पती खासदार धैर्यशील माने हे दाम्पत्य मुळातच समाजशील आहे. कारण ते खासदार व्हायच्या अगोदरही त्यांनी त्यांचा वाढदिवस डोंगर कपारीतील काही मंडळींना मदत देवून साजरा केला होता. त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यानंतर ते खासदार झाले. एकंदरीत काय आजही समाजातील अनेक मंडळींची हृदयं समाजातील आर्थिक मागास लोकांसाठी धडपडत आहेत. आज सौ. वेदांतिका माने यांनी केलेलं योगदान हे खासदार पत्नी म्हणून नव्हे, तर माणुसकीची जाणीव असणारं एक “आपलं माणूस ” म्हणून केली आहे. आज समाज अजूनही अशा अनेक व्यक्तींमुळे सुरळीत चालला आहे. अनेक सामाजिक संस्थांमुळे ताठ मानेने उभा आहे. यापैकी शाहुवाडी तालुक्यातील शैक्षणिक व्यासपीठ हि शिक्षक मंडळींची संस्था निश्चितच कौतुकास्पद आहे.
सौ. वेदांतिका माने ताई साहेब व शैक्षणिक व्यासपीठ संस्था अशा मंडळींमुळे समाजातील माणसाला माणुसकी जगात शिल्लक आहे, याची जाणीव होत आहे.