सरुडा त अज्ञातांकडून चोरी : २१,७०० चा ऐवज लंपास
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी बस स्थानक परिसरातील दोन खाजगी दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही रेकॉर्डर (डीव्हीआर ), कॉम्प्यूटर बॅटरीसह सुमारे २१,७००/- रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
शुक्रवारी दि.५ जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली असून, नजीकच्या शेतकरी बझार मालकाने इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मोटरसायकलवरून आलेल्या या चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. सदरच्या घटनेची बांबवडे पोलीस दूरक्षेत्र मध्ये नोंद झाली आहे.
पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी ,सरूड बस स्थानक परिसरात असणाऱ्या खाजगी दुकानगाळ्यांपैकी सतीश मोबाईल शॉपी या दुकान गाळ्यांवरील पत्राखोऱ्याच्यासहाय्याने उचकटून दुकानात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्यांनी काही मोबाईल संच ,सेंट च्या बाटल्या पसार केल्या आहेत. याचवेळी चोरट्यांनी बाजूच्या सिद्धिविनायक फोटो स्टुडीओ च्या शटर्स चे कुलूप कापून आतमधील सीसीटीव्ही रेकॉर्डर ( डीव्हीआर ),कॉम्प्यूटर बॅटरीची चोरी करून पोबारा केला आहे. येथील गाळेमालक दादासाहेब नांगरे-पाटील यांनी आपल्या शेतकरी बझार इमारतीवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटरसायकलवरून चोरीच्या अनुषंगाने आलेल्या या चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
दरम्यान शुक्रवारी सकाळी दुकान मालकाला हि चोरीची घटना निदर्शनास आली. त्यांनी सदर घटनेची नोंद बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात वर्दी दिली. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले. परंतु हे श्वान परिसरात फिरून काही अंतरावरील चौकात घुटमळले. यापूर्वीही या दोन्ही दुकानातच बऱ्याचदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलीसातही या चोरीच्या घटना नोंद झाल्या आहेत. विशेष म्हणजे या दुकानांचे चालक असणारे युवक साधारण परिवारातील आहेत. कोणाशीही वैरभाव न पत्करणाऱ्या या होतकरू युवकांना चोरीच्या निमित्ताने चोरट्यांनी वारंवार लक्ष्य केल्याने परिसरात घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.