सावेत बिबट्या च्या हल्ल्यात ११ मेंढरांचा बळी : सायंकाळी ४ वाजण्याची घटना
बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी इथं माळरानावर गोगवे गावाच्या दिशेला शेतात बसलेल्या मेंढरांवर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात ११ मेंढरांचा बळी गेला आहे. यापैकी १ मेंढराला अर्धवट बिबट्याने खाल्ले असून, बाकीच्यांची नरडी फोडली आहेत. अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.
सावे येथील गोगवे गावाच्या दिशेला असणाऱ्या माळरानावर ईश्वरा वग्रे ( वय ५० वर्षे अंदाजे ) यांची मेंढरं बसली होती. आज दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने येथील मेंढरांवर हल्ला चढविला. यामध्ये १० मेंढरांची नरडी फोडली, तर एकाला चक्क निम्म्यापर्यंत खाल्ले असल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळी वनरक्षक आशिष पाटील, नायकवडी, शंकर लव्हटे या वन कर्मचाऱ्यांनी भेट देवून, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटना स्थळी ग्रामस्थांनी खूप गर्दी केली होती.
दरम्यान शित्तूर वारुण परिसरात तसेच शिंपे, वडगाव परिसरातून बिबट्याने सावे कडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. सदर बाबत ग्रामस्थांनी काय दक्षता घ्यावी, याची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.