सेनेच्या जहाजाचा खलाशी म्हणजे शिवसैनिक सेनेसोबतच – विजय लाटकर
बांबवडे : जेंव्हा भर समुद्रात ‘ जहाज ‘ एकाकी चालत असताना, जहाजाला भोक पडलं , तर पहिले उंदीर पळून जातात. पण खलाशी मात्र आपल्या जहाजासोबत कायम असतो. इथं शिवसेना हे जहाज आहे , आणि खलाशी हा शिवसैनिक आहे. जोपर्यंत शिवसैनिक आहे. तिथे स्वार्थाला आलेल्या त्सुनामी ला, तो कधी घाबरणार नाही. आपल्या शिवसेनेच्या जहाजासोबत तो कायम पणे उभा राहील, असे मत शाहुवाडी तालुका उपप्रमुख विजय लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

सध्या महाराष्ट्रात दिल्लीश्वरांनी पुरस्कृत केलेला राजकीय भूकंप आला आहे. सत्तेच्या लालसेपोटी काही मंडळींनी सरकार पडण्याचा चंगच बांधला आहे. आणि प्रसार माध्यमांसमोर ” मी नाही त्यातली “, असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

ज्यावेळी छत्रपतींच्या काळात पुरंदरचा तह झाला, त्यावेळी सुद्धा मुरारबाजी धारातीर्थी पडल्यानंतर, राजे एकाकी झाले होते. त्यांनासुधा त्यावेळी तह करावा लागला होता. परंतु दिल्लीश्वरांच्या कचाट्यातून महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतली, आणि स्वराज्याची पुन्हा जोमाने उभारणी केली.

नेमकी तीच परिस्थिती आज शिवसेनेत उद्भवली आहे. उद्धव ठाकरे साहेबांना नामोहरम करण्यासाठी त्यांचीच माणसे त्यांच्या विरोधात उभी करण्यात आली आहेत. परंतु शिवसेना हि त्यागावर आणि स्वाभिमानावर उभी राहिली आहे. याची जाणीव कदाचित शिंदे साहेब विसरले असावेत.

परंतु शिवसेना आणि शिवसैनिक आपल्या नेतृत्वासोबत आहेत. कुणी कुठेही गेले, तरी शिवसैनिक मात्र उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम आहे.आणि राहणार. समुद्राला जेंव्हा ओहोटी येते, तेंव्हा काहींना असे वाटते , कि समुद्र संपला, पण त्यानंतर काही दिवसातंच समुद्राला उधाण येतं. हे मात्र संबंधितांनी विसरू नये. लाटा येतात , लाटा जातात, पण समुद्र मात्र तिथेच असतो, आणि त्याचा किनारा सुद्धा तिथेच असतो. याचा कुणालाही विसर पडू नये.

या परीस्थितीत शाहुवाडी शिवसेना मात्र उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम राहणार, असे मत विजय लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.