हमीभावापेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा- विजयराव खोत
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील व्यापारी, शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून भात खरेदी करीत आहेत. शेतकरी अडचणीत असल्याचे पाहून, शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून पिळवणूक होत आहे. तरी सदर व्यापारी वर्गावर त्वरित कारवाई व्हावी, व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी पंचायत समितीचे उपसभापती विजयराव खोत यांनी शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिले आहे.

त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि, सध्या तालुक्यातील व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून १२००/- ते १३००/-रु. क्विंटल दराने भात खरेदी करीत आहे. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना हि खरेदी करता येत नाही. शासनाने ठरवून दिलेला हमीभाव १८६८/-रु. प्रति क्विंटल असा आहे. तरीदेखील व्यापारी वर्ग त्यापेक्षा कमी दराने हि खरेदी करीत असल्याने, आज शेतकरी खऱ्या अर्थाने नाडला जात आहे. यावर शासनाने त्वरित कारवाई करावी, व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन देताना शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत, सचिन मूडशिंगकर, अभयसिंह चौगुले, गजानन निकम, दिलीप बंडगर, सुरज बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.