१५ एप्रिलपासून “ लॉक डाऊन अधिक कडक ” सर्व दुकाने बंद : ग्रामपंचायत बांबवडे
बांबवडे : केवळ दुध, दवाखाने, मेडिकल शिवाय इतर कोणतीही दुकाने उघडू नयेत, तसेच इतर गावातील बांबवडे त येणाऱ्या आणि फिरणाऱ्या लोकांवर शाहुवाडी पोलिसांनी कारवाई करावी, अशा आशयाची मागणी आणि सूचना बांबवडे ता. शाहुवाडी येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती ने केली आहे. तशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आज बांबवडे येथील कोरोना संदर्भाने झालेल्या आढावा बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आले. यामध्ये दुध सकाळी १० वाजेपर्यंत ,तर संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत विक्री करणेचे आहे. याव्यतिरिक्त दुधाचे कोणतेही दुकान यावेळेशिवाय उघडू नये. तसेच शेती सेवा केंद्रे १० ते १ वाजेपर्यंत च उघडी ठेवावीत. तसेच बांधकाम करणारे कोणतेही कामगार गावात येवू नयेत, जेणेकरून बांधकामे बंद रहावीत. तसेच डॉक्टर व मेडिकल कायमस्वरूपी उघडी ठेवण्यास हरकत नाही. याव्यतिरिक्त किराणा माल किंवा तत्सम कोणतीही दुकाने उघडू नयेत. तसेच कोणत्याही वस्तूची चढ्या भावाने विक्री केल्यास,तसेच साठा केल्यास, त्या दुकानदारांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
तसेच शाहुवाडी पोलिसांनी कडक कारवाई करून, येथील लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी करावे. इतर गावाहून बांबवडे इथं येणाऱ्या लोकांना पोलिसांनी मज्जाव करावा, याबाबत दक्षता घ्यावी, अशा आशयाचे पत्र शाहुवाडी पोलिसांना दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याबाबत कळविण्यात आले आहे.
या आढावा बैठकीस ग्रामपंचायत सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, पोलीस पाटील संजय कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पाटील आवळीकर, व विद्यमान सदस्य विष्णू यादव, सुरेश नारकर, आदी सदस्य, सचिन मुडशिंगकर, तसेच ग्रामसेवक जी.एस.कमलाकर, तलाठी नसीम मुलाणी व कोरोना दक्षता समिती यावेळी उपस्थित होती.