सामाजिक

वारणानगर येथे शेतकरी संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

वारणानगर :
पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याची जानेवारी पासूनची बिले अजून मिळाली नाहीत. ही बिले लवकरात लवकर मिळावी, म्हणून आज वारणा साखर कारखाना शेती कार्यालया समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उपोषण करण्यात आले.
यावर्षीचा गळीत हंगामा संपून तीन महिने झाले आहेत. ऊस तोडल्यापासून १४ दिवसात एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असताना, पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याची जानेवारी पासूनची बिले अजून मिळाली नाहीत. याबाबत दिनांक २५ मे रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल एफ आर पी + २०० रु.असा ठरलेला दर द्यावा,याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून श्री तात्यासाहेब कोरे साखर कारखान्यास देण्यात आले होते, पण आज पर्यंत वारणा साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना थकीत ऊस बिले मिळालेली नाहीत.
वारणा परिसरातील शेतकऱ्यांचे ऊस बिल मिळाले नसल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सोसायटी, बँका थकीत हप्त्यासाठी पाठीमागे लागल्या आहेत. सध्या शेती मशागतीचे दिवस आहेत, पण त्यासाठी पैशाची गरज आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार भेटून थकीत बिल मिळणेबाबत वारणा साखर कारखानास विनंती करून देखील, आश्वासन शिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक वैभव कांबळे यांनी सांगितले.
श्री तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव पाटील यांनी सदरची थकीत बिले दिनांक २० जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर, हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. पण २० जून रोजी थकीत बिल नाही मिळाल्यास दिनांक २९ जून रोजी पुणे येथे कारखाना प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा, इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश वैभव कांबळे यांनी दिला. यावेळी वारणा साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोल्हे, संचालक सुरेश पाटील, प्रशासकीय अधिकारी दादासाहेब जाधव व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!