कार-टेम्पो रिक्षा अपघातात तिघे जखमी
बोरपाडळे वार्ताहर :-
नावली (ता.पन्हाळा) येथील वळणावर मोटारीने रिक्षाटेम्पोला समोरून जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले.
घटनास्थळीं मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नावली येथील गॅस प्लांट नजीक नागमोडी वळणावर चिपळूणहुन कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने बांबवडेकडे भंगार व्यवसायासाठी निघालेल्या रिक्षा टेम्पोला समोरुन जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या मध्ये भंगार व्यावसायिक विनोद शंकर गोसावी, विशाल बाळू गोसावी, अजय संजय गोसावी, (रा.वडगांव ता. हातकलगले ) हे तीघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात सकाळी ८.३० च्या सुमारास झाला. वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघातात रिक्षाटेम्पोचा चक्काचूर झाला असून, मोटारीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमीना त्वरित उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची कोडोली पोलिसात नोंद झाली असून, पो.एकनाथ गावंडे पुढील तपास करत आहेत.