शिराळ्यातील बांबर वाडीत दोन लहान भावांचा बुडून मृत्यू
शिराळा (प्रतिनिधी ) : बांबर वाडी तालुका शिराळा इथे गणेश लक्ष्मण कदम (वय ११ वर्षे ) व अरुण लक्ष्मण कदम (वय ६ वर्षे ) या दोन्ही सख्ख्या भावांचा येथीलच शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी दुपारी १ वाजणेच्या दरम्यान घडली. याची कोकरूड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, गणेश कदम, अरुण कदम, हर्षद हरिबा कदम हे तिघेजण मंगळवारी बांबर वाडी येथील शेत तळ्यात पोहायला गेले होते. त्यातील लहान अरुण कदम हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता.तो बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ गणेश ह्याने पाण्यात उडी मारली. हे दोघेही पाण्यात गटांगळ्या खावू लागल्याने त्याचा चुलत भाऊ हर्षद हा घाबरून घरी पळाला. त्याने ग्रामस्थांना सांगितले. तसे ग्रामस्थांनी शेत तळ्याकडे धाव घेतली. दरम्यान पाण्यात पडलेल्या दोन्ही भावांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कदम कुटुंब दारिद्र्य रेषेखालिल असून मुलांचे वडील मुंबईत मोलमजुरी करीत आहे. तर आजोबा,आजी वयस्कर आहेत. त्यांचे दोन चुलते गावी शेती करतात. असा परिवार आहे. या घटनेमुळे बांबर वाडीसह गुढे पाचगणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटंबियांनी या दुखद घटनेमुळे फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
सदर घटनेची कोकरूड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे करीत आहे.