पदाचा गैरवापर केल्याने सरपंचांसहित सात जणांवर कारवाई : विभागीय आयुक्त एस.चोकलींगम
शिराळा ( प्रतिनिधी ) : मांगरूळ तालुका शिराळा येथील गायरान मध्ये खासगी व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायतीच्या सरपंच ,उपसरपंच यांच्यासह इतर सदस्यांनीही दुर्लक्ष करून आपले कर्तव्य पार पाडलेले नाही,तसेच बोगस ठराव केल्याप्रकरणी सरपंच मनीषा कुंभार, उपसरपंच संग्रामसिंह पाटील यांच्यासह सात जणांना सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त एस. चोकलींगम यांनी दिला आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह खांडेकर यांनी तक्रार केली होती. मांगरूळ येथील शासनाच्या मालकीच्या सर्व्हे नंबर ३१९/अ/१ या गायरान जमिनीत २४ जून २०१२ रोजी गणेश शंकर म्हस्के व युवराज धोंडीबा म्हस्के यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरु केले होते.त्यास तत्कालीन सरपंच संग्रामसिंह पाटील यांचा पाठींबा होता,असे मत खांडेकर यांचे आहे.म्हणू न बांधकाम सुरु असताना विजयसिंह खांडेकर यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. याबाबत ग्रामसेवकांनी संबधितांना नोटीस काढली होती. परंतु त्या नोटीस वर सरपंचांची सही नव्हती. त्यामुळे नोटीस हि,फक्त दाखवण्यासाठी होती,असे तक्रारदाराचे मत होते.त्यानंतर ते बांधकाम काढण्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.दरम्यान २९ जून २०१२ च्या मासिक सभेत ते बांधकाम काढू नये,अशा आशयाचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. त्यानंतर ५ जानेवारी२०१३ ला ग्रामसेवकांनी अतिक्रमण विरोधात संबंधितांना नोटीसा काढण्यात आल्या. त्यावरही सरपंचांच्या तसेच उपसरपंचांच्या सह्या नव्हत्या. दरम्यान २२ मार्च २०१३ रोजी चौकशी समिती नेमण्यात आली. परंतु अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत हटविण्यात आले नाही. ७ जून २०१२ रोजी करण्यात आलेला ठराव पुन्हा २८ जानेवारी २०१३ च्या मासिकसभेत मंजूर करण्यात आला.दरम्यान ७ म ई २०१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना कारवाई तून वगळण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान २८ जानेवारी २०१३ ला बोगस ठराव करण्यात आला. त्या ठरावास भीमराव ताम्बिरे, सुधीर कुंभार, सुषमा शेणवी, कमल म्हस्के, यांनी बहुमतांनी पाठींबा दिला.त्यामुळे त्यांचा बेजाबाबदारपणा व संगनमत दिसून आल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची कारवाई पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी केली.