बीड विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप चे सुरेश धस विजयी : ७६ मतांची घेतली आघाडी
पुणे : लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप च्या सुरेश धस यांनी विजय मिळवला असून, यामुळे येथील महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची ताकद भाजप मध्ये पुन्हा सिद्ध झाली आहे. या निकालामुळे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना पुन्हा मात खावी लागली आहे.
या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा लागला होता.
सुरेश धस हे भाजप चे माजी मंत्री होते. हि विधान परिषदेची निवडणूक भावा-बहिणीमध्ये प्रतिष्ठेची झाली होती. सुरेश धस यांना ५२६ तर अशोक जगदाळे यांना ४५१ मते मिळाली आहेत. धस यांनी ७६ मतांची आघाडी मिळवत अशोक जगदाळे यांचा पराभव केला.