बोरपाडळे च्या ग्रामसभेत ‘उत्खनन बंद ‘ चा ठराव सर्वानुमते मंजूर
पैजारवाडी प्रतिनिधी :-
बोरपाडळे ता पन्हाळा येथे झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये स्टोन क्रेशर व उत्खनन बंद करण्या बाबतचा ठराव, सर्वानुमते मंजूर झाल्याने क्रेशर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच शरद जाधव हे होते या ठरावयानुसार स्टोनक्रेशर व त्यासाठी होणारे उत्खनन बंद करण्याची कार्यवाही संबंधित खात्याने न केल्यास कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको व उपोषण अशी तीव्र आंदोलने करण्याचा इशाराही या सभेत देण्यात आला.
सचिव ग्रामसेविका माधुरी साळोखे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून, सभेच्या विशेष विषयानुसार कुटुंब या नवे प्रचलित गायरान (गट नं ६०३) परिसरात असणारी स्टोन क्रशर व येथे होणाऱ्या बेसुमार उत्खनन बंद करण्याच्या ठरावाचे वाचन केल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली.
यावेळी शेतकरी सर्जेराव मोहिते यांनी क्रेशरच्या भूसुरुंगामूळे आपल्या बायोगॅस डोंमला व घराच्या भितीला तडे गेले असून, स्टोन क्रशर च्या धुळीने आपल्या शेतजमिनीत कोणत्याही प्रकारचे पीक येत नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार शामराव साळोखे, प्रदीप लबडे, कृष्णात लबडे, हंजुबाई पाटील यांनी स्टोन क्रॅशरच्या भूसुरुंगामूळे आपल्या बोअरवेलचे पाणी गेल्याची तक्रार केली त्याच बरोबर भूसुरुंगाचे दगड घरावर पडल्याने, घराची कौल फुटून प्रचंड नुकसान होत असल्याचे व सुरूंगाच्या आवाजाने लहान मुलं भेदरून जात असल्याची तक्रार, प्रकाश कणेरकर यांनी केली.
धनाजी पाटील यांनी आपली तक्रार व्यक्त करताना सांगितले की, गाव गायरान मध्ये चार इलेक्ट्रिक मोठ्या डीपी व २६ इलेक्ट्रिक खांब क्रशरसाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी उभे केले असून, विद्युत तारा कमी उंचीवर असल्याने, अनेक शेतकऱ्याच्या जीवितास धोका असल्याचे सांगितले. या गायराणात सामाजिक वनीकरण विभागाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून, पर्यावरण संतुलित राखण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या स्टोन क्रेशरच्या धुळी मुळे अमाप प्रदुषण होत आहे, आणि गायरान परिसरात मोठमोठे खडीचे ढीग टाकल्याने व दगड, माती, मुरूम उत्खनन करण्यासाठी, गायरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने वृक्ष व वनीकरण संपुष्टात आले आहे. तसेच पूर्वी याच गायरानातून अडीच लाख पेंढ्या गवत गावातील शेतकऱ्यांना मिळत होते, पण या केलेले उत्खनन, वाहनाची वर्दळ आणि धुळीच्या साम्राज्यामुळे गवत मिळत नसल्याने, गवताच्या लिलावातून मिळणारी तीन लाखाहून अधिक आर्थिक नुकसान ग्रामपंचायतीला सोसावे लागत असल्याचे सांगितले.
गावातील गायरानासह इतर सर्व मालमतेची आपण विश्वस्त म्हणून रक्षण करावे. कोणाही वयैक्तिक स्वार्थ जपू नये. संबंधित क्रेशर व उत्खनन बंद होईपर्यंत, लोकशाही मार्गाने कोणतेही आंदोलन करण्यासाठी , आपण सर्व सज्ज राहीले पाहिजे, असे वक्तव्य के.एस.पाटील यांनी केले.
ग्रामसभेच्या शेवटी संबंधित स्टोन क्रेशर व उत्खनन बंद करण्याच्या विषयाचा ठराव वाचन करताच उपस्थित ग्रामस्थांनी आपले हात उंचावून सर्वानुमते मजुरी दिली. यावेळी उपसरपंच सौ.संगीता बिरंजे, ग्रा.पं. सदस्य संजय लबडे, सचिन पाटील, सतीश निकम, गोरख वारके, सरिता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल पाटील, शिवाजी बिरंजे, तसेच २७० ग्रामस्थांनी सह्या केल्या. ग्रामसभेमध्ये महिला व तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता.