…अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : बोरपाडळे तरुणांचे निवेदन
पैजारवाडी प्रतिनिधी :
बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथिल ग्रामपंचायती कडून आजवर युवकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्धतेसाठी कोणतीही ठोस कामे केली नसल्याने युवकांचा शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक विकास होण्यास मोठी कुचंबणा होत असून, हुशार, होतकरू युवकांच्या प्रोत्साहनासाठी कोणतेही कार्यक्रम अथवा उपक्रम राबवले नाहीत. तसेच युवकांसाठी कोणत्याही शासकीय सुविधा उपलब्ध करून न दिल्याची उदासीनता व्यक्त करत, गावातील सर्व तरुणवर्ग संघटित होऊन, ग्रामपंचायतीला विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात युवकांसाठी प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज व्यायामशाळा, सर्व सोयीनियुक्त वाचनालय, या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दयाव्यात, त्याच बरोबर प्राथमिक ते उच्च स्तरीय शिक्षण घेत असलेल्या, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शासकीय व शैक्षणिक सुविधा आणि त्याकरिता लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर जाहीर करावे, अशा आणि अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामसेविका सौ.माधुरी साळोखे यांचेकडे दिले.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवकांनी दिला आहे.
या वेळी सरपंच शरद जाधव, उपसरपंच बिरंजे, सदस्य सतीश निकम, गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकवर्ग हजर होता.