जेष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या ‘मोरूची मावशी’ या नाटकाने खूप नावलौकिक झाला होता.
ज्येष्ठ नाट्दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कोल्हटकर यांचा मुलगा अमेरिकेवरुन रात्री उशिरापर्यंत पुण्यात येणार असल्याने शनिवारी कोल्हटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती सूत्रांकडून समजली.
दर्जेदार नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेणारे करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. राजाचा खेळ,कवडी चुंबक, मोरुची मावशी, बिघडले स्वर्गाचे दार ही त्यांची नाटके प्रेक्षकांना भावली होती. तसेच शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगड्या या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांच्या निधनावर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.