वारणानगर मध्ये ९ ते १३ डिसेंबर कृषी प्रदर्शनाचे आयोजन
कोडोली वार्ताहर :
वारणानगर ता.पन्हाळा येथे दरवर्षीप्रमाणे, यावर्षी ही वारणा उद्योग समूहाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.तात्यासाहेब कोरे स्मृतीपर्वकाळ निमित्त वारणा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती यावेळी तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही.एस.कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली .
यावर्षी प्रदर्शनामध्ये बदल करण्यात आला असून, यावर्षी कृषी प्रदर्शन ९ ते १३ डिसेंबर दरम्यान सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये खते, औषधें, बी बियाणे, औजारे याच बरोबर यावर्षी राज्यभरातून आदर्श पशुधन देखील ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे. तसेच प्रदर्शन दरम्यान मनोरंजन कार्यक्रम व डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १ टनाची गाडी ओढणारा कुत्रा, रंगीबेरंगी चिमण्या, कडकनाथ कोंबडी, लेजर तंत्रज्ञानाचे नांगर फाळ, परदेशी भाजीपाला व १ टनाचा बैल असे नाविन्यपूर्ण या प्रदर्शनामध्ये पहावयास मिळणार आहे. तसेच छ.शाहू महाराजांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनमध्ये ३०० स्टॉल ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळणी व खाद्यजत्रा देखील असणार आहे. यावेळी या पत्रकार परिषदेस शेती पूरक संस्थेचे उपाध्यक्ष आर.वाय.खोत, प्रशासकीय शेती अधिकारी दादा जाधव, व्यवस्थापक आर.बी.कुंभार, विक्रम जगताप, सचिन पाटील, संदीप गिड्डे उपस्थित होते.