…हीच खरी सामाजिक बांधिलकी
कोडोली प्रतिनिधी :-
पडसाळी ता.पन्हाळा येथे वारणानगर येथील श्री वारणा विद्यालयाच्या सन १९९२ साली पास झालेल्या बॅचच्यावतीने ‘ वारणा स्नेह्वृधी ‘ हा माझी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघाच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून पन्हाळा तालुक्यातील दुर्गम अशा कोलीक पडसाळी भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
वारणानगर येथील,श्री वारणा विद्यालयातून सन १९९२ साली १० वी ची बोर्ड परीक्षा पास होऊन बाहेर पडलेल्या एकूण १०० विद्यार्थ्या पैकी ८० जण सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली आहेत, आणि त्यांनी मागील वर्षी ‘ वारणा स्नेहवृद्धी ‘ हा माझी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे. या संघाच्या माध्यमातून स्नेहसंमेलन तर आयोजित केली जातातच, तसेच सहकाऱ्यांच्या सुख, दुःखात हि सहभाग नोंदवला जातो. नुकतेच या संघाच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून पन्हाळा तालुक्यातील दुर्गम आणि अती वृष्टी असलेल्या कोलीक पडसाळी भागातील ५ प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्याना रेनकोटचे वाटप केले आहे. या परिसरातील २५० विद्यार्थांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी वारणा स्नेहवृद्धी संघाचे,यशवंत चव्हाण, मंदार जोग, सचिन पाटील, विजय मोरे , सचिन चिखलकर , अरविंद भोसले, युवराज पाटील, लक्ष्मण कोडगुळे, आणि राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.