खेळ आणि कौशल्य विकासाला महत्व द्या- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
कोडोली प्रतिनिधी:-
शिक्षणात कौशल्य विकासावर भर दिला, तर नक्कीच बेकारीला आळा बसेल. नवनव्या प्रयोगामुळे शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल होतो आहे. शिक्षणासाठी शासन विविध योजना आखत असून, त्याचा फायदा मुलांनी घेतला पाहिजे. खेळ आणि कौशल्य विकासाला महत्व देत, तरुणांनी आपले करिअर घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
ते सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोहरे हायस्कूल ता.पन्हाळाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ , स्मरणिका प्रकाशन आणि शिवाजी विकास सेवा संस्था -शिवनेरी उद्योग समूहाच्या बहुउद्देशीय सभागृह च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्यशिक्षित युवक पुरवण्याचे काम भारत करेल, मुलींची शिकण्याची प्रवृत्ती कौतुकास्पद आहे. मोहरे हायस्कूलसारख्या संस्थांमुळे मुलींना शिक्षण प्रवाहात येणे सोपे झाले आहे. मुलीना शिकवण्यात आई-वडिलांची भूमिका जबाबदारी महत्वाची असलेचे मत, माजी अपारंपरिक उर्जामंत्री विनय कोरे यांनी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.
पंचवीस वर्षात शाळेने अनेक पुरस्कार मिळवत नावलौकिक मिळवला. शाळेसाठी भाडे तत्वावर शासकीय जागा मिळावी, वारणा-काखे नदीवरील नवीन पूल , आरळे-मोहरे रस्त्यावरील पूल दुरुस्ती, शहापूर- मोहरे रस्ता नुतनीकरण आदि मागण्या संस्थापक , सचिव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.शिवाजीराव मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविकात केल्या.
शाहुवाडी परिक्षेत्रचे पोलीसउपअधिक्षक आर.आर.पाटील,जिल्हापरिषद बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, गटशिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत, कोडोलीचे अशोकराव पाटील, जिल्हाप्रदेशध्यक्ष समीत कदम, पन्हाळा सभापती पृथ्वीराज सरनोबत, जि.प.सदस्या सौ.वैशाली माने, पं.स.सदस्या.सौ.वैशाली पाटील , परिसरातील सरपंच , उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. शाळेचे उच्च्यपदस्थ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.
उपाध्यक्ष जयसिंग पायमल, संचालक आनंदा शिंदे, आनंदा कुंभार, मानसिंग डोईफोडे, भाऊसाहेब मोहिते, ज्ञानदेव मोरे, मोहन लोहार, सर्व शिक्षक व कर्मचारी आदींचे सहकार्य मिळाले. मुख्याध्यापक रघुनाथ मदने यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती संस्थेचे अध्यक्ष प्रा,शिवाजीराव मोहिते यांनी आभार मानले.