थ्री फेज कनेक्शन पासून वंचित असलेल्या गावांना अखंडित वीज पुरवठा -आम.नाईक
शिराळा प्रतिनिधी :
तडवळे व गवळेवाडी सबस्टेशन मुळे थ्री फेज कनेक्शन पासून वंचित असलेल्या गावांना यापुढील काळात वीज पुरवठा अखंडितपणे होणार असून, या परिसरातील वीज ग्राहकांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यामध्ये यशस्वी झालो असल्याचे, प्रतिपादन आ.शिवाजीराव नाईक यांनी केले.
ते नवीन प्रशासकीय इमारत, शिराळा येथे वीज ग्राहकांच्या अडी अडचणी सोडविणे संदर्भात आयोजित करणेत आलेल्या उर्जामित्र बैठकीत बोलत होते. या बैठकीस भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रजनीकांत शेंबडे, उप कार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे, प्रदीप सुरवसे, पी. एम. बुचडे, सहाय्यक अभियंता रुपेश कोरे आदि प्रमुख उपस्थित होते.
आ. नाईक पुढे म्हणाले कि, संपूर्ण राज्यामध्ये एकमेव शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये दर महिन्यात उर्जामित्र बैठकीचे होत असलेमुळे ग्रामीण भागातील सर्व सामान्य वीज ग्राहकांच्या विविध अडी अडचणी व तक्रारींची दखल घेऊन, त्या तक्रारींची जागेवरच सोडवणूक केली जात आहे. या बैठकीत वादळी वारा व पावसामुळे ज्या ठिकाणी विद्युत खांब व तारांचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करणेबाबत, महत्वपूर्ण चर्चा करणेत आली. तसेच मतदारसंघामध्ये शासनाच्या विविध योजनांमधून वीज कनेक्शनची कामे मंजूर झाली आहेत, परंतु त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही, अशा ग्राहकांना वीज जोडणी देणेत यावी. सदर कामे संबंधित ठेकेदाराकडून तातडीने पूर्ण करून घेणेत यावीत. शासनाच्या योजनेतून कोणताही वीज ग्राहक वीज कनेक्शन पासून वंचित राहता कामा नये.
आ. नाईक पुढे म्हणाले, तालुक्यातील गावात वीज मीटर पोहोचली आहेत, परंतु वीज वितरण कंपनीला याची काहीही कल्पना नाही. सध्या जे वायरमन ज्या गावासाठी नेमून दिले आहेत, त्यांनी त्याच गावामध्ये काम करावे. लोकांनी तक्रारीबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फोन केला असता, तेथील अधिकारी फोन उचलत नाहीत. तसेच गिरजवडे येथिल वीज ग्राहकाचे वीज मीटर दुरुस्तीसाठी नेले असताना देखील, वीज बिल आकारले जात आहे. त्याचबरोबर वीज मीटरचे रीडिंग न घेता ग्राहकांना अंदाजे वीज बिलाची आकारणी करून वीज बिले दिली जात आहेत. वीज ग्राहकांच्या अशा अनेक अडचणी लक्षात घेऊन यामध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. यामध्ये जे अधिकारी अथवा कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांना लोकच यापुढे घेराव घालतील.
या बैठकीस कुसाईवाडी सरपंच विनोद पन्हाळकर, भटवाडी सरपंच विजय महाडिक, कुसळेवाडी सरपंच श्रीकृष्ण कुसळे, पाडळी उपसरपंच महादेव पाटील, बाळाबाई नलवडे, पारूबाई सोंडूलकर, शिवाजी पाटील, बाजीराव सपकाळ, उत्तम पाटील, भरत निकम, सुहास कांबळे, दिपक पाटील आदीसह वीज ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.