आपल्या ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा- उपमुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख
पैजारवाडी प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे,असे मत प्रतिपादन जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी देवाळे तालुका पन्हाळा इथं विद्यार्थी दत्तक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
देवाळे गावचे सुपुत्र भगवान पाटील यांनी गावातील दहा मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
या दत्तक कार्यक्रमात श्री देशमुख पुढे म्हणाले कि, मुलांनी स्वतः च्या प्रगतीबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. श्रीमंत माणसं देणग्या देत असतात, पण भगवान पाटील यांच्यासारख्या, स्वकष्टावर संसाराचा चरितार्थ चालवत, समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे फारच कमी लोक असतात. त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, आणि स्वतः चे व आईवडिलांचे नाव उज्वल करावे. असे विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते.
यावेळी भगवान पाटील यांचा श्री देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर श्री पाटील यांनी दत्तक घेतलेल्या काजल ढेरे, धीरज ढेरे, सोनम पाटील, प्रदीप पाटील, श्रेयस लोहार, वैष्णवी शिंदे, निशिकेश पाटील, रोहन मगदूम, अभिजित लोहार, अनिकेत जाधव, या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व फी देण्यात आली.
लोकराजा शाहू महाराजांच्या मुळेच गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. या त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. जिद्दीने प्रयत्न केल्यास अशक्य गोष्टी साध्य होतात. असे श्री नलगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शिवशाहीर राजू राऊत, शाहीर अजित आयरेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस चंद्रकांत गराडे , देवाळे चे उपसरपंच राजू विभूते, रामभाऊ पाटील, पैजारवाडी सरपंच अलका हिरवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.