शिराळ्यात तीन हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी मंडल अधिकारी व तलाठी जाळ्यात
शिराळा ( प्रतिनिधी ) : जमिनीच्या दस्ताची नोंद घालून सातबारा उतारा देण्यासाठी, चरण चे मंडलअधिकारी सुरेश भीमराव पाटील (वय ५५ वर्षे ),व तलाठी संजय बुधो पाटील ( वय ४३ वर्षे ) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले.
याबाबत समजलेली हकीकत अशी कि,तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी चरण मंडल चे मंडलाधिकारी सुरेश पाटील रा.अक्षर कॉलनी, दत्त टेकडी, इस्लामपूर ,व पाचगणी येथील तलाठी संजय पाटील रा.शिक्षक कॉलनी ,शिराळा ,यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीने हि रक्कम तीन हजार रुपये अशी ठरली. याबाबत लेखी तक्रार, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे आज सकाळी केली होती. त्यानुसार आज शिराळा तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचून पोलीस अधीक्षक सुहास नाडगौंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला, पोलीस नाईक तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, पोलीस हवालदार अजित कर्णे, विशाल जगताप, संभाजी काटकर, विनोद राजे यांनी कारवाई करून या दोघांना रंगेहाथ पकडले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली चे पोलीस निरीक्षक हरिदास जाधव करीत आहेत.