‘ साहेब ‘ म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी, ‘ साहेब ‘ म्हणजे मराठी धमन्यातील तेजस्वी रक्त, ‘ साहेब ‘ म्हणजे मराठी माणसाचा ‘ शेवटचा शब्द ‘…
बांबवडे : मराठी मनावर अनभिषिक्त राज्य गाजवणारे सम्राट म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे . त्यांचा आज पाचवा स्मृतिदिन.यानिमित्त …
‘ बाळासाहेब ठाकरे ‘ हे नाव ऐकताच ज्याच्या अंगावर शिरशिरी येते, हे नाव ऐकताच ज्याच्या मुठी आवळल्या जातात, तो म्हणजे खऱ्या अर्थाने मराठी माणूस. आज शिवसेना आहे. पण त्यातील सम्राट मात्र अजूनही दिसून येत नाही. ते चित्र आज धूसर झाल आहे.भाव-भावांच्या राजकारणात मराठी माणूस कधीच बाजूला फेकला गेला आहे. साहेबांनी मराठी माणसासाठी पांघरलेली भगवी शाल आजमात्र अनुभवायला मिळत नाही.आज साहेबांच्या सभेला आलेला पूर पाहायला मिळत नाही. केवळ हुजरेगिरी साहेबाना कधीच पसंत नव्हती. त्यांना हवा होता पोलादी मनगटाचा आणि निधड्या छातीचा शिवरायांचा मावळा . आणि त्यांनी तो निर्माण हि केला होता. पुन्हा एकदा इतिहासाने पुनरावृत्ती केली. ज्याप्रमाणे शंभूराजे स्वराज्याचे युवराज होते,त्याप्रमाणे आपलं उत्तरदायीत्व तयार करण्या-अगोदरच साहेब गेले. ‘साहेब ‘, केवळ सम्राट नव्हते तर प्रत्येक मराठी माणसाचं एक दैवत होतं. याचं कारण जर विचारलं तर, असं सांगता येईल, ज्यांनी मुंबईत राहून १९९२ पासून व त्या अगोदरच्या दंगली ज्यांनी अनुभवल्या आहेत. त्यांना विचारलं कि,उत्तर मिळेल. ‘साहेब ‘ म्हणजे काय ?
‘ साहेब ‘ म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी, ‘ साहेब ‘ म्हणजे मराठी धमन्यातील तेजस्वी रक्त, ‘ साहेब ‘ म्हणजे मराठी माणसाचा ‘ शेवटचा शब्द ‘…
आज ‘साहेब ‘ जावून पाच वर्ष पूर्ण होत आहेत. साहेबांच्या माघारी आलेलं पोरकेपण दूर होईल असं वाटलं होतं. परंतु नाही, ते अद्याप तरी घडलेलं नाही. साहेबांनी मराठी माणसांसाठी अनेकवेळा,अनेक प्रसंग अंगावर घेतले. त्यांनी कधी सत्तेसाठी अपेक्षा लावून बसले नाहीत. जिथे अपमान होतो, तिथून साहेबांचा जरबी आवाज निघायचा, ती असायची एका वाघाची डरकाळी. मग त्या ठिकाणी काहीही होवो, शब्द गेला म्हणजे गेला . चुकला तरी चालेल पण मराठी माणसासाठी त्यांनी कधी कुणाला भिक घातली नाही. ‘ माझा शिवसैनिक आणि माझा महाराष्ट्र ‘ ,या शब्दातील आपुलकी आता शोधावी लागत आहे. साहेबांची सभा म्हटली कि, ‘आबालवृद्ध,महिला आणि माझे लाखो शिवसैनिक ‘ , हे, ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असायचे. पण तोच आवाज पाच वर्षांपूर्वी अनंतात विलीन झाला. मराठी माणूस खऱ्या अर्थाने पोरका झाला. आणि जी आजवर शिवसेनेशी युती व्हायला पाहिजे म्हणून देव पाण्यात ठेवून बसायचे, तेच आज उरांवर बसायला लागलेत. राजकारणाचा भाग वेगळा. पण मराठी मनाला एकमेव आधार होता ,तो साहेबांचा. कोणेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेत सेनेचा केवळ एकच आमदार निवडून आला. पण साहेब त्यावर कधी नाराज झाले नाही. माझा एकच वाघ पुरेसा आहे. असं म्हणणारे साहेब हे मराठी मनातील जाज्वल्य अंगार होते. त्यामुळे बाहेर कितीही तणाव असला तरी मराठी मनात आधाराची ऊब असायची.
‘ साहेब ‘ एक न संपणारं काव्य होतं. ‘ साहेब ‘ एक न संपणारा ग्रंथ होते, ‘ साहेब ‘ एक अंतराची अस्फुट फुटलेली ‘ आर्जव ‘ होती.
‘ साहेब ‘ ….