सावे गावात दि.१३ ते १५ मार्च पर्यंत निनाई देवी मंदिर वास्तुशांती व लोकार्पण सोहळा
बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी इथं निनाईदेवी मंदिर वास्तुशांती, कलश रोहन व लोकार्पण सोहळा समारंभास आज दि.१३ मार्च पासून सुरुवात झाली. सकाळी मंदिराचा कलश सावे पैकी चौगुलेवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरापासून भजन,टाळ ,मृदुंगाच्या गजरात दिंडी स्वरुपात आणण्यात आला. कलश गावातील इतर वाड्यांमध्ये सुद्धा नेण्यात आला.
आजपासून सुरु झालेला हा सोहळा १३, १४, १५ मार्च पर्यंत सुरु रहाणार आहे. आज दि.१३ मार्च रोजी देवीला अभिषेक ,कलश मिरवणूक आणि दिंडी सोहळा, व रात्री ९ ते ११ वाजता ह.भ.प. कृष्णात कुंभार महाराज (सागाव ) असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दि. १४ मार्च रोजी होम हवन, कलश पूजन, वास्तुशांती होणार आहे. कलश रोहन प.पु. रामदास महाराज यांचे हस्ते होणार आहे. गुरुवर्य गोपाळ आण्णा वास्कर महाराज (पंढरपूर ) यांचे कीर्तन संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. रात्री सावे, सावर्डे, भैरेवाडी, जुळेवाडी, सवते , शिरगाव, शिंपे, मोळवडे, बजागेवाडी आदी गावची भजनी मंडळे भजनाचा कार्यक्रम करणार आहेत.
दि.१५ मार्च रोजी देवता पूजा, सत्यनारायण पूजा ११ वाजता लोकार्पण सोहळा, माहेरवासींची ओटी भरणी, व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी ८ वाजता बालभावसरिता हा लहान मुलांचा वाद्यवृंद कार्यक्रम असणार आहे.
सदरचा लोकार्पण सोहळा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती चे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी देवस्थान समिती कोल्हापूर च्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, श्री. विजय पोवार, संचालिका सौ संगीता खाडे , संचालक शिवाजी जाधव, रयत साखर चे रवींद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती च्यावतीने देण्यात आली. सदर च्या कार्यक्रमाचे निमंत्रक सावे उपरोक्त समिती व सावे गावातील नोकरदार,व्यावसायिक व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.