मातीतून उचललेल्या शब्दात आपलंपण असतं- श्रीनिवास पाटील
शिराळा, ( प्रतिनिधी ) : आयुष्य घडवण्यासाठी जीवनातील सत्य लपवून चालत नाही. त्यास सामोरे जावे लागते. कलाकाराला आपली कला सादर करताना, त्या भूमिकेत उतरावे लागते. तेच काम शिवाजीराव कुंभार यांनी केले असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
येथील साई संस्कृती मंगल कार्यालयात लेखक राजन गवस यांना कै. माजी प्राचार्य शिवाजी कुंभार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील “समर्पण सन्मान पुरस्कार” वितरण प्रसंगी बोलत होते. गौरव स्मृतीचिन्ह आणि रुपये पंचवीस हजार असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कै. माजी प्राचार्य शिवाजी कुंभार यांचे स्मरणार्थ कुटुंबीय तसेच मराठी साहित्य परिषद शाखा शिराळा व प्रचिती सांस्कृतिक मंच शिराळा, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘समर्पण सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
यावेळी पाटील म्हणाले, ग्रामीण भागातल्या बोली भाषेचे साहित्य आपलं मानून समाजासमोर मांडले पाहिजे. कारण मातीतून उचललेल्या शब्दातून आपलेपण आढळून येते.
मानसिंगराव नाईक म्हणाले, कुंभार सरांनी विद्यार्थी घडवण्याचे काम केले.त्यांचे कलेवरील प्रेम लोकांना आपलंसं करणार होते. ते आपल्या विविध कलांच्या माध्यमातून नेहमीच दुसऱ्यासाठी जगले.
राजन गवस म्हणाले, चौफेर व्यक्तिमत्व व जीवंत माणूसपणाचा झरा म्हणजे शिवाजीराव कुंभार होते. मी लिहिणारा आहे, मिरवणारा नाही. माझ्या लिहिण्याचा केंद्रबिंदू हा गरीब व वंचित आहेत. गरिबांचा संसार जनावरे चालवतात, बाकीचे मात्र गरिबीची चेष्ट करतात. शिक्षणामुळे श्रम हद्दपार झाल्यानं खेड्या पाड्यांची वाताहत झाली. विश्वासाने बोलून आपलं मन मोकळे करावे, असे नातं राहिलेले नाही.
प्रारंभी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते राजन गवस यांना समर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी.आर.जाधव यांची भारतीय कुस्ती महासंघ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आर.डी.सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांनी केले. कार्यक्रमास कल्पना कुंभार, चारुशीला कुंभार, गायत्री खैर, अधिक खैर, लक्ष्मण कुंभार, विराज नाईक, डी.आर.जाधव, शामराव पाटील, भगतसिंग नाईक, हंबीरराव नाईक, दि. बा. पाटील, राजेंद्र नाईक, सभापती मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंह नाईक, पं. स.सदस्या वैशाली माने, सुनंदा सोनटक्के, जि. प.सदस्या आशा झिमुर, डी.एन.मिरजकर, एस.एम.पाटील, पवन खेबुडकर उपस्थित होते. आर.बी.शिंदे यांनी आभार मानले.