वाडीभागाई (ता.शिराळा) येथील डोंगराला शॉर्ट सर्किटने आग : अंदाजे ५० लाखांचे नुकसान
शिराळा प्रतिनिधी : वाडीभागाई (ता.शिराळा) येथील नंबरच्या डोंगरातील गवताला शॉर्ट सर्किटने आग लागून ५०० एकरातील गवत जाळून खाक झाल्याने, अंदाजे ५० लाखाचे नुकसान झाले आहे.
हि घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत घटनास्थळ व ग्रामस्थांच्यातुन समजलेली माहिती अशी कि,, वाडीतील महिला नंबरच्या डोंगरात गवत काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या परिसरातून ३३ के व्ही.च्या विद्युत तारा गेल्या आहेत. त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन, ठिणगी गवतावर पडताच आगीने रुद्र रूप धारण केले. कडक ऊन व वारा यामुळे आगीचा जोरात भडका उडाला. त्यावेळी महिलांनी गावात माहिती दिली. हि माहिती कळताच वाडीभागाई, कणदूर, पुनवत, नाटोली, अस्वलवाडी, पावलेवाडी, वन विभागाचे कर्मचारी अशा पाचशेवर लोकांनी पाच तास आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विश्वास कारखान्याची अग्नी शामक गाडी बोलावली होती. पण डोंगरात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गाडी परत नेण्यात आली. घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवा नेते विराज नाईक, विद्युत वितरणचे सहायक अभियंता बुचडे यांनी भेट देऊन पाहणी केली. काही लोकांनी गेले दोन दिवसापासून गवत काढणीस सुरुवात केली. जवळपास ९९ टक्के लोकांनी गवत काढलेले नाही. त्यामुळे येथील जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, सर्वत्र नाराजी पसरली आहे.
चौकट- सलग आगीने नुकसान
याच डोंगरात गेले आठ वर्षपासून असे आगीचे प्रकार घडत आहेत. या बाबत ग्रामस्थांची विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार करून हि अद्याप यावर उपाय योजना केलेली नाही. एक रुपया हि नुकसान भरपाई मिळालेली नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच आग लागून अस्वलेवाडी येथील पती पत्नीचा मृत्यू झाला होता. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वाडीभागाई (ता.शिराळा) येथील डोंगराला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे पाचशेवर एकरातील गवत जाळून खाक झाले आहे.