जेऊर इथं व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क ठरणार कोल्हापुरातील पर्यटन केंद्र -नाम.चंद्रकांत पाटील
पैजारवाडी प्रतिनिधी:-
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणाऱ्या मसाई पठाराच्या पायथ्याशी चालू असलेला व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या टेबललॅंड असलेल्या मसाई पठराच्या पायथ्याशी जेऊर ग्रामपंचायत, वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती जेऊर मार्फत साकारत असलेल्या भव्य व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कची सुरुवात यावर्षीच्या उन्हाळा सुट्टीत करण्याच्या दृष्टीने कामाची पहाणी व आढावा घेणेसाठी ते आले होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेत, प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याच्या झिपलाईन बरोबरच प्रामुख्याने समावेश असलेल्या क्लायमिंग वॉल, रॉक क्लायमिंग ॲन्ड रॅपलींग, हाय रोप कोडस, झॉरबिंग बॉल, बंजीइजेक्शन, स्लॅक लाईन, पॅरासिलींग, साहसी खेळांतील थराराचा अनुभव देणारे स्लीक लाईन, पठारावर पॅराशुट अशा वेगवेगळया ९ पर्यावरणपूरक नाविण्यपूर्ण घटकांची प्रात्यक्षिके पाहिली. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हात पर्यटन वाढीसाठी जेऊर मध्ये होत असलेल्या, या पार्क सारखे विविध प्रकल्प पूर्ण करून शेती,औद्योगिक बरोबर पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल. त्याच बरोबर या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही. तसेच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती बरोबरच रानमेव्याला बाजारपेठ मिळणार असून, पर्यटकांना वनपर्यटनाचा आस्वाद मिळणार आहे. त्यातून लोप पावत चाललेली पारंपारिक साहसी खेळांची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या कामाची पहाणी केल्या नंतर पत्रकारांशी बोलताना श्री. पाटील यांनी या पार्कमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांना पाहण्यासाठी असलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत नवीन स्थळाचा समावेश होणार आहे.तसेच या पार्क मुळे पर्यटन वाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असलेचे सांगितले.
यावेळी उप-वनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार रामचंद्र चोबे, पंचायत समिती सभापती पृथ्वीराज सरनोबत, या प्रकल्पाचे प्रमुख विनोद कांबोज, चंदन मिरजकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड,
वन अधिकारी प्रशांत तेंडूलकर, सरपंच प्रियांका महाडिक, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष धोंडीराम पाटील, प्रकाश वरेकर, वंदना बोरे, करुणा वाघमारे आदीसह वनव्यवस्थापन समिती सदस्य व मान्यवर उपस्थित होते.