विराज नाईक व अमोल पाटील यांचा ब्राझील दौऱ्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने सत्कार
शिराळा प्रतिनिधी : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकार साखर कारखान्यात विस्तारीकरणासह आधुनिकीकरण, तसेच इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर संचालक विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी महत्वपूर्ण ब्राझील दौरा पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचा विश्वास कामगार संघटना, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवतीने संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे व सरचिटणीस विजयराव देशमुख यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, नवी दिल्ली यांच्यामार्फत दिनांक 4 जून ते 12 जून या कालावधीसाठी ब्राझील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘साखर आणि जैव इंधन’ याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता.

राज्यातील अनेक कारखान्यांचे प्रतिनिधींचा या दौऱ्यात सहभाग होता. येथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोजन कारखान्यात सध्या सुरू असलेल्या विस्तारीकरणासह आधुनिकीकरण, तसेच इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीत होईल. आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडेल, किंवा आवश्यक ठिकाणी बदल करता येतील. असा विश्वास संचालक श्री. नाईक व कार्यकारी संचालक श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कामगार संचालक दत्तात्रय पाटील, संघटना उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.