शिराळ्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी स गोरक्षनाथ मठात भाविकांच्या रांगा
शिराळा / प्रतिनिधी :पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त शिराळा येथील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मठामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोरक्षनाथ मठाचे मठाधीपती योगी पीर पारसनाथजी महाराज व पुजारी आनंदनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीमध्ये आषाढी एकादशी संपन्न झाली.
पहाटेपासूनच भाविक या ठिकाणी उपस्थित होते. भक्तांनी गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मठामध्ये नगरपंचायत शिराळा मार्फत स्वच्छता करण्यात आली होती. मठाचे स्वयंसेवका मार्फत भाविकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिराळा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे पांडुरंग अर्थात विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी उपस्थित राहून भक्तांना दर्शन देतात, तशी अख्यायिका सांगितली जाते, अशी श्रद्धा भक्तांची आहे. त्यामुळे भाविकांच्या मोठ्या श्रद्धा गेली अनेक वर्ष शिराळ्याच्या गुरु गोरक्षनाथावर आहेत. त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, ते भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरु गोरक्षनाथ मंदिरात उपस्थित राहून या ठिकाणी असणाऱ्या गोरक्षनाथ महाराज व विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला आवर्जून भेट देतात व दर्शन घेतात.
महायोगी गुरु गोरक्षनाथ मठातर्फे प्रतिवर्षी पंढरपूरला दिंडी जाते. यावर्षी देखील गेलेल्या दिंडीला गावकरी व परिसरातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेची आरती त्यानंतर अभिषेक पार पडला. मठाधिपती पिर योगी पारसनाथजी व आनंदनाथजी यांच्या मार्गदर्शनाखाली एकादशीचा कार्यक्रम पार पडला.