सावर्डे खुर्द येथील आरोग्य सेविकेचा खून
बांबवडे : सावर्डे खुर्द तालुका शाहुवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका शैलजा अरविंद पाटील यांचा, त्यांचे पती अरविंद सर्जेराव पाटील वय ३५ वर्षे याने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना सावर्डे खुर्द इथं घडली आहे. या घटनेची फिर्याद भिमराव साधू पाटील यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळास पोलीस उपाधीक्षक अनिल कदम यांनी भेट दिली. तसेच शाहुवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री निरंकारी यांनी देखील भेट दिली.
शाहुवाडी पोलीस सूत्रांकडून व सावर्डे खुर्द तालुका शाहुवाडी येथील घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शैलजा अरविंद पाटील वय ३० वर्षे या सावर्डे खुर्द येथील शासकीय आरोग्यसेविका निवास स्थानी आपल्या पती व मुलांसह रहात होत्या. पहाटे त्यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. शैलजा पाटील या प्राथमिक आरोग्य केंद्र माण अंतर्गत सावर्डे खुर्द येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्य क्षेत्रांतर्गत सावर्डे, ससेगांव, मोळवडे, शाहुवाडी, चनवाड हि गावे येतात. सध्या त्या पेरीड येथील प्रा.एन.डी.पाटील महाविद्यालय येथील कोव्हीड सेंटर मध्ये कार्यरत होत्या. आज डी.२९ मी रोजी पहाटे ५.४५ पूर्वी सदरची घटना घडली असून, सदर च्या गुन्ह्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सदरच्या घटनेमुळे शैलजा पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अरविंद पाटील याचे मूळ गाव माले तालुका पन्हाळा येथील असून शैलजा पाटील यांचे माहेर गोटखिंड तालुका वाळवा जि.सांगली हे आहे.
शैलजा पाटील यांच्या पश्चात दोन मुलगे आहेत.
सदर च्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.सिंघण करीत आहेत.