लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ ” सावे बंद “
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सावे इथं घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज सावे गाव पूर्णत: बंद करण्यात आले असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकाळी १० वाजता गाव मिटिंग बोलवण्यात आले असल्याचे समजते.

दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या पिडीत बालिकेची स्थिती रात्री उशिरा नियंत्रणात आली असल्याचे समजते.

दरम्यान आरोपी यशवंत नलवडे हा मेंढपाळ असून, दुसऱ्यांची मेंढर पाळत होता. काल बुधवार दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान या नराधमाने हे क्रूरकर्म केले असल्याचे समजते. या घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला स्थलांतर केले. त्याच्या घराभोवती पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सर्व सामान्य वर्गातून होत असल्याची चर्चा आहे. सध्यातरी गावात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.