सह्याद्रीचा माथा संपन्न करण्यासाठी पर्यटन गरजेचे- धैर्यशील माने
बांबवडे (दशरथ खुटाळे ) : तालुक्यातील पर्यटनाच्या माध्यामातून उद्योजक तरुण पिढी घडविण्यासाठी पत्रकारांनीही योगदान द्यावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.

आंबा तालुका शाहुवाडी इथं खासदार धैर्यशील माने यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. या अगोदर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायत आंबा, मानोली, विशाळगड येथील पदाधिकारी, हॉटेल मालक, तसेच विशाळगड येथील दर्ग्याची समिती देखील उपस्थित होती.
इथं संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार धैर्यशील माने म्हणाले कि, येथील तरुण बेरोजगारी न राहता पर्यटनाच्या माध्यमातून त्याने उद्योजक बनावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

तसेच आपल्या तालुक्यातील शेत पिकाला भाव येण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणारी इंडस्ट्रीज इथं आणणे गरजेचे आहे.यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. सध्या पर्यटकांचा कल देशी पर्यटनाकडे वळला आहे. म्हणून आपला शाहुवाडी तालुका पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. त्यासाठी आज पहिली अधिकारी बैठक घेतली आहे. यामधून इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. इथला शेतकरी तरुण स्वत:चा उद्योग उभारून उद्योजक बनेल. इथं विशाळगड, गेळवडे, उदगिरी सारखी धार्मिक त्याचबरोबर निसर्गसंपन्न अशी स्थळे आहेत. ती पर्यटन स्थळे व्हावीत,यासाठी आपला कल आहे. यातून कागदावर न ठेवता खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत आम्ही घडविणार आहोत. यामुळे तालुक्यातील जैवविविधता जपली जाईल.

सह्याद्रीचा माथा खऱ्या अर्थाने संपन्न करावयाचा असेल तर ,पर्यटन वाढले पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेणे गरजेचे आहे.

यावेळी कृषी उद्योगावर देखील चर्चा झाली. भात पिकं, रताळे पिकं यांना भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याने केवळ ऊस पिकाकडे लक्ष न देता, त्यांच्याकडे असलेल्या जमिनीला कोणते पिकं पोषक ठरते, हे पाहून पिकं घेतली, तर शेतकरी नक्की संपन्न होईल.
या पत्रकार परिषदेला विविध दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार परिषदेचे व्यवस्थापन श्री विजय देसाई सरकार यांनी केले होते.