के. डी. कदम उर्फ ‘तात्या ‘ : एका श्रमजीवी पत्रकाराचा दुर्दैवी अंत
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार के.डी. कदम उर्फ तात्या यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. शाहुवाडी तालुक्यातील एक उल्लेखनीय पत्रकार आणि श्रमजीवी शेतकरी आज आपल्यातून हरपले आहेत. ते शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य होते.
तात्या एक श्रमजीवी शेतकरी यासोबत हाडाचा पत्रकार होते. अशीच त्यांची शाहुवाडी तालुक्यासह जिल्ह्यात ओळख होती. तात्यां नी आपल्या लेखणी च्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली होती. समाजातील अनेक प्रश्न त्यांनी ऐरणीवर मांडले होते. तालुक्यातील पाणी टंचाई, शैक्षणिक उणीवा, आणि विकासात्मक कामांची गरज आदि बाबींवर तात्यांनी नेहमीच सडेतोड लेखन केले. याचबरोबर नागपंचमी हा शिराळा तालुक्यातील भावनात्मक विषय नेहमीच तात्यांच्या लिखाणातील कंगोरा ठरला. तात्यांच्या आवडीचा विषय ‘ कुस्ती ‘ ,यावर त्यांनी नेहमीच स्फूर्तीदायक लेखन केले. आमच्यासारख्यांनी तात्यांकडून कुस्ती च्या लेखनाबद्दल धडे घेतले. शेती हा विषय तात्यांच्या स्वानुभवाचा भाग होता. त्यामुळे या विषयावर ते भरभरून लिहित होते.
लिखाण करतानाच सूत्रसंचालन हा विषय देखील तात्यांनी मोठ्या खुबीने निभावला,आणि साकारला देखील. त्यांच्या वर्तनातून अनेक सूत्रसंचालक तालुक्याला मिळाले असे म्हटले तर, वावगे ठरू नये. सुत्र्संचालानासोबत काव्य हा विषय देखील तात्यांच्या आवडीचा विषय होता.त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. तात्यांचे सगळ्यांशीच स्नेहाचे ऋणानुबंध राहिले. राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, प्रशासकीय आणि समाज या सर्वच क्षेत्रात तात्यांनी आपला ठसा उमटवला होता. तात्यांची बाळूमामा देवस्थानावर अपार श्रध्दा होती. कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘जय बाळूमामा ‘ हे घोषवाक्य पत्रकारांमध्ये खूपच प्रसिद्ध होते.
असेच समाजाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारे ‘तात्या ‘ लवकर गेले. असे आम्हा पत्रकारांना वाटते. तात्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे.
तात्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . तात्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रधांजली .