गिरणगावातील “बीडीडी” चाळी घेणार मुक्त श्वास
मुंबई (प्रतिनिधी ) : गिरण्यांमध्ये राबणारा कष्टकरी आणि श्रमिक वर्ग थकून भागून ज्या खुराड्यांकडे विसाव्यासाठी जायचा,ती खुराडी म्हणजे बीडीडी चाळ. या चाळीत १६० चौ.फु. असलेल्या खोल्यांच्या मोबदल्यात फडणवीस सरकार त्यांना ५०० चौ.फु. देणार आहे. या १९४ चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २२ एप्रिल रोजी होणार आहे. एकेकाळी घुसमटलेल्या चाळी २३ मजल्यांच्या होतील,आणि उंच आकाशात मुक्त श्वास घेतील.
एकंदरीत काय कष्टलेल्या जीवांना खुराड्यांच्या ऐवजी फ्लॅट मिळणार, हि बातमी वाटते तितकी लहान नाही, कारण याच बीडीडी चाळींनी अनुभवलेय एकेकाळची गरिबी, याच १६० चौ.फुटात रहात होत्या तीन-तीन पिढ्या. त्याही अगदी गुण्यागोविंदाने. त्यावेळी नव्हता राजाराणीचा संसार. त्यावेळी होती एकत्र कुटुंब पद्धती. तरीसुद्धा फुलले होते अनेकांचे संसार. आणि आता कितीही मोठा फ्लॅट असला तरी वृद्धापकाळी आईवडील एक तर असतात गावी, नाहीतर वृद्धाश्रमात. याच गिरणगावा ने अनुभवलंय संपाचं भीषण वास्तंव. याच वास्तवात गिरणगावातील पिढी देशोधडीला लागली.त्यातून जी तग धरून राहिली तीच हि माणसं .देवेंद्र सरकारचं अभिनंदन करावं तितकं थोड होईल. कारण वाळवंटातील चटके, इथं सोसलेल्या या गिरणगावच्या श्रमिकांना त्यांनी दिलंय समाधानाचं अमृत.
स्वप्नात नसलेले दिवस येवू घातलेत , त्यामुळे गिरणगावातील रहिवाशांच्या तोंडावर समाधान चमकू लागले आहे.