संपादकीय

सावधान सह्याद्री नागवतोय….

गेली शेकडो वर्षे ज्या ज्या वेळी महाराष्ट्राची भूमी अडचणीत आली, त्या त्यावेळी मराठी मातीसाठी सह्याद्री नेहमीच धावून आला आहे. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. काही आप्तेष्टांच्या मदतीने परकीय मंडळी सह्याद्री गिळू पाहत आहेत. याचे भान आपण ठेवले पाहिजे. खनिज, झाडे, जंगले हि आपली संपत्ती आहे. आजवर आपल्या अज्ञानाचा परकीय मंडळी फायदा घेत होती. पण आज मात्र आपलीच मंडळी आपलाच गैरफायदा घेवून आपल्याच सह्याद्री ला गिळू पाहत आहेत. तेंव्हा सह्याद्री ला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीने पुढे येणे गरजेचे आहे, कारण आजही या मातीत स्वाभीमान जिवंत आहे. तेंव्हा सह्याद्री ला वाचवण्यासाठी शाहुवाडीकरांनो एकत्र या आणि सह्याद्री वाचवा.
शिवकालीन इतिहासात जेंव्हा या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्याची गरज होती. तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीची साद ऐकली. अवघा महाराष्ट्राचा मुलुख पालथा घालून स्वराज्यासाठी एक,एक मोहरे निवडले आणि अवघा मावळा एकत्र केला आणि स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्य निर्मितीत सह्याद्रीचाच सिंहाचा वाट आहे. हा सह्याद्री पाठीशी उभा राहिला नसता तर मुघलांना आवरणे,कठीण झाले असते. हे या मातीसाठी सह्याद्रीचे मोलाचे योगदान आहे.
इंग्रजांच्या काळातही सह्याद्री स्वातंत्र्यवीरांसाठी भूमिगत होण्यासाठी धावून आला होता. म्हणूनच इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्यवीरांनी ‘पत्रीसरकार ‘ ची म्हणजेच ‘प्रतिसरकार ‘ ची निर्मिती केली. आपला देश आर्थिक मंदीतून निघाला होता. तेंव्हा हाच सह्याद्री नैसर्गिक रानमेवा च्या माध्यमातून आपल्या गरीब जनतेला वाचवण्यासाठी देव ठरला.
नंतर मात्र ज्या सह्याद्री ने शेकडो वर्षे आपल्यावर उपकार केले, त्याच सह्याद्रीला ओरबाडायला आपल्याच काही लोकांनी सुरुवात केली. आणि बॉक्साईट च्या स्वरूपातून त्याचे हृदय ओरबाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यवेळी सुद्धा या उत्खनन करणाऱ्या मंडळींनी जनतेला अशीच फसवी स्वप्ने दाखवली. रोजगार निर्मिती, भागाचा विकास. परंतु आज जर मागे वळून पहिले तर आपल्याला चित्र दिसेल ते, सर्वसामान्य जनता आहे तिथेच आहे. समाजाचा किती विकास झाला, हे आपण सगळे पहातच आहोत.
आता पुन्हा एकदा लॅटेराईट च्या उत्खननाच्या माध्यमातून हा सह्याद्री ओरबाडला जाणार आहे. या सह्याद्रीच्या कुशीत आपण जगत आलो आहोत.आज या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. लॅटेराईट च्या उत्खननाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सह्याद्री नागवला जाणार आहे. आणि शाहुवाडी ची जनता हे कदापि सहन करणार नाही. करणा इथं विश्वास आहे ,छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या हृदयातला. इथ संस्कृती आहे जिजाऊ साहेबांच्या मातृत्वाची,आणि जिगर आहे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची. तेंव्हा या सह्याद्रीला हि शाहुवाडी ची जनता कधीच पोरकं होवू देणार नाही.
सावधान सह्याद्री नागवतोय….

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!