सैनिकाचा न्याय “लाल फितीत” रहाणार का ?
आंबवडे येथील जवाना च्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीला लवकरात लवकर ताब्यात न घेतल्यास, जो देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करतो, अशा सैनिकालाच न्याय मिळता,मिळता, लाल फितीत अडकून पडेल, अशी भीती सामान्य जनतेला वाटू लागली आहे.
आंबवडे तालुका पन्हाळा, येथील जवान दिपक भुजंग पोवार यांचा घातपाताने मृत्यू झाल्याची तक्रार, त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. तरी अद्याप कोणासही अटक न झाल्याने, सैनिकाला तरी न्याय लवकर मिळेल, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची होती.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, दिपक पोवार सैन्यात असताना, त्यांची पोस्टिंग बेळगाव इथं झाली होती. तिथे ते सैनिकी क्वार्टर मध्ये न राहता खाजगी खोली घेवून राहत होते. रात्रीच्यावेळी त्यांच्या बेडला अचानक आग लागल्याने ते गंभीर रित्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पत्नीबाबत शंका व्यक्त केली होती.परंतु याबाबत त्यांच्या पत्नीलाही अद्याप ताब्यात न घेतल्याने, त्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आंबवडे ग्रामस्थांनी “रास्तारोको आंदोलन” देखील केले होते. परंतु पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देवून तात्पुरती मलम पट्टी केली, आणि आंदोलन गुंडाळण्यात आले. परंतु सैनिकाला देखील न्यायाची अशी वाट पहावी लागत असेल, तर त्यासारखे दुर्दैव ते काय?
याबाबत लवकरात लवकर संशयिताला ताब्यात घेतल्यास या प्रकरणाचा तपास तत्काळ लागेल, अन्यथा आरोपीला त्यावर मार्ग काढण्यास संधी मिळेल,आणि सैनिकाचा न्याय मात्र लाल फितीतच अडकून राहील.