संपादकीय

जिथं उमाळा च नाही, तिथं पाणी कुठून येणार ?

ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या प्रश्नावर भाजपा ची सत्ता आली,त्याच पक्षाचे प्रदेक्षाध्यक्ष खास. रावसाहेब दानवे साहेबांची जीभ पुन्हा एकदा घसरली.”एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात साले”.यातूनच आपल्या संवेदनहीनतेची कल्पना येते. दानवे साहेब तूर पिकवायला आपल्याच मंडळींनी शेतकऱ्याला सांगितले होते. आज १ लाख टन तूर खरेदी केली, म्हणजे फार मोठे कर्तुत्व केले, असे जर आपल्याला वाटत असेल, तर तो आपला गैरसमज आहे. अशा व्यक्तीने मुळात स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा आहे, हे समजणे चुकीचे आहे. कारण शेतकऱ्याच्या व्यथा, जर आपल्याला कळत नसतील, तर तुम्ही शेतकरी कसे? असा प्रश्न उपस्थित होतो.
मुळात आपल्या शासनाला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही, हेच खरे आहे. कारण कर्जमाफी केली, तर शेतकऱ्याच्या आत्महत्त्या थांबतील का ?, हा प्रश्न आपल्याच शासनाने केला होता. एकूण काय आत्महत्त्या हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा वाटत नाही. हेच या एकूण प्रकरणावरून वाटते. साहेब ,आत्महत्त्या कोण हौशेसाठी करत नाही. कर्जाचं ओझं काय असतं, हे आपल्याला कसे कळणार? एकीकडे शेतकरी उध्वस्त होत असताना, आपल्या घरात शाही सोहळे संपन्न होतात, यावरून आपल्याला याविषयी किती गांभीर्य आहे, हे दिसून येते. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकीकडे ‘संवाद यात्रा ‘ काढण्याच्या गोष्टी मुख्यमंत्री करतात, तर दुसरीकडे मात्र पांढऱ्या कपड्यांच्या आत असलेला आपल्या शासनाचा भीषण चेहरा या प्रकरणावरून समोर आला आहे. ‘संवाद यात्रा ‘ हा केवळ राजकीय स्टंट असून, आपल्या सत्तेचे पाय कसे घट्ट राहतील, यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न होता, हेच दानावेंच्या या वक्तव्यावरून समोर आले.
शेतकऱ्याचा फायदा राजकारणासाठी किती घ्यावा, यालासुद्धा मर्यादा असते. याच शेतकऱ्याने आपल्या हातात सत्तेच्या किल्ल्या दिल्या. कारण मागचे महाशय धरणात ….करायला निघाले. आणि आत्ता आपण तर हद्दंच केली. एकीकडे तूर बाहेरून आयात करायची, कच्ची साखर आयात करायची, आणि बेमालूमपणे शेतकऱ्याचे कंबरडे मोडायचे आणी १ लाख टन तूर खरेदी केली म्हणजे, किती उपकार केले, याची जाणीव करून द्यायची. तूर पिकवायला आपणच सांगितली, आणि खरेदी करायची नाही.
अवकाळी पावसाने शेती मोडीत निघालीय, शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होवू लागले आहेत, अशावेळी आपल्याकडे दिलेल्या सत्तेचा किती गैर वापर करायचा, यालासुद्धा मर्यादा आहेत. साहेब, जर याच शेतकऱ्याने आपल्या हाती सत्ता दिली नसती, तर आपण कोण? याचा परिचय सुद्धा महाराष्ट्राला झाला नसता, याचेही भान ठेवा. आणि अशा मंडळींची पाठराखण करायला, पक्षाचे बडे बडे नेते पुढे येवू लागले आहेत. राम कदम यांच्यासारख्या संस्कारक्षम व्यक्ती सुद्धा भाषेचे कारण पुढे करत, त्यांचे तसे म्हणणे नव्हते, हे सिद्ध करायला जीवाचा आटापिटा करताहेत.
या सगळ्यांपेक्षा शेतकरी केंद्रबिंदू मानून त्य प्रश्नाकडे गांभीर्याने पहिले तर , निदान शेतकऱ्यांसाठी प्रयत्न तरी करतात,अशीच आपल्या पक्षाची प्रतिमा झाली असती. असो, जिथं उमाळा च नाही, तिथं पाणी कुठून येणार ? कितीही उकरले, तरी हाताला मातीच लागणार.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!