‘ विश्वास ‘ चा दुसरा हप्ता सोमवार पर्यंत जमा
शिराळा : ‘ विश्वास ‘ सह.साखर कारखान्याने सन २०१६-१७ सालाच्या हंगामास गाळपासाठी आलेल्या ऊसाला दुसऱ्या हप्त्यासाठी प्रतिटन १५०/- रु. देणार असून सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा होईल. सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम ऊसाला दुसरा हप्ता जाहीर करण्याचा मान ” विश्वास ” ने मिळवला असून, दीपावलीला अंतिम हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी माहिती माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.
चिखली तालुका शिराळा येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व संचालक उपस्थित होते.
यावेळी नाईक पुढे म्हणाले कि, विश्वास कारखान्याने नेहमीच शेती, शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड जास्तीत जास्त कशी होईल, आणि उत्पादकता कशी वाढेल, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कशी होईल, तसेच शेतीपूरक व्यवसायास चालना देणे,आदि पातळीवर चांगले काम केले आहे. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा ऊस दराच्या माध्यमातून फायदा होण्यासाठी डीस्टीलरी, सहवीज निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरूप जीवाणू खत, कार्बनडाय ऑक्साईड बॉटलींग प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. ऊसाला पहिली उचल २७०० देण्यात आली होती. दुसऱ्या हप्त्यासह शेतकऱ्याला २,८५० रु. पोहोचणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे अधिकाधिक नोंद करावा, असे आवाहनही अध्यक्ष मानसिंग राव नाईक यांनी यावेळी केले.
प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी ए.एन. पाटील यांनी आभार मानले.