उन्नत महाराष्ट्र अभियान मध्ये कोरे महाविद्यालयाचा समावेश
कोडोली प्रतिनिधी:-
वारणानगर, ता.पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या उन्नत महाराष्ट्र अभियान मध्ये झालेला असून, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक व विकासाशी संबंधीत प्रश्नांची संशोधनाद्वारे उकल करून, त्यावर अचूक उपाय योजना शोधणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध शासकीय यंत्रणा व शैक्षणिक संस्था यांच्या दरम्यान विशेषत: सामाजिक व आर्थिक स्वरुपाच्या महत्वाच्या गंभीर समस्या संदर्भात संशोधन वृधिंगत करण्यासाठी विविध प्रकल्प तसेच निरनिराळ्या योजना, अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी, याची स्थापना महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
उन्नत महाराष्ट्र अभियानाची ठळक उद्दिष्टे :
१. स्थानिक पातळीवरील समस्यांची उचित तंत्रज्ञानाचा वापर करून, उकल करण्यासाठी तसेच संशोधन विकासास चालना देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे.
२. अभ्यासक्रम आणि संशोधन स्थानिक पातळीवरील विकास योजना करणेसाठी.
३. संस्थेमधील व संस्था परिसरातील समाजाचा विकास विषयक समस्यांवर संशोधन करणेसाठी, तंत्रज्ञान आणि विकास कक्षाची स्थापना करणे.
अभियानांतर्गत हाती घ्यावयाचे प्रकल्प :
सदर अभियानांतर्गत उदाहरणादाखल हाती घेण्यासारखी कामे खाली नमूद करण्यात आली आहेत. या धर्तीवर विविध शासकीय यंत्रणा (स्थानिक स्वराज्य संस्था,महामंडळे जिल्हा नियोजन व विकास समिती, शासकीय विभाग, इत्यादी) आणि शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातूनही व अशा प्रकारची अन्य कामे घेता येतील.
१. मनरेगा, जलयुक्त शिवार अभियान, जलस्वराज्य अभियान, ऑडीट व नियोजन अथवा आढावा
२. ग्राम स्वच्छता, शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन या संदर्भातील विविध सांख्यिकी माहितीच्या आधारे ग्रामस्तरावर नियोजन आराखडा तयार करणे, व आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक कार्यपद्धती निश्चित करणे.
३. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच आदिवासी उप-योजनेंतर्गत ग्रामस्तरावरील योजना / सामाजिक वनीकरण याकरिता सूक्ष्म नियोजनातून योजना तयार करणे, तसेच अंमलबजावणीसाठी मार्गदर्शिका तयार करणे.
४. जिल्हा योजनांतर्गत रस्ते विकास, रस्त्याचे मुल्यांकन करून मजबुतीकरणासाठी आवश्यक अंदाजपत्रकाची तपासणी करणे.
५. जिल्हा विकासाकरिता, जिल्ह्यांच्या विविध विकास कामांकरिता आवश्यक भौगोलिक माहिती व्यवस्थापन तयार करणे.
६. पाणी पुरवठा योजनांचे मुल्यांकन करणे, नियोजन, आराखडा व अंमलबजावणी काळात आढावा घेऊन, वेळोवेळी याबाबत आढावा अहवाल सादर करणे.
७. तालुका व जिल्हास्तरीय विविध सुविधांचे नियोजन व मुल्यांकन करणे, जसे कि उर्जा, विद्युत प्रणाली , वाहतूकव्यवस्था इ.
८. लघुउद्योग व ग्रामुद्योग यांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढवणे.
९. महानगर पालिका व नगर पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन ,पाणी पुरवठा व इतर सुविधांचे व प्रकल्पाचे मुल्यांकन करणे.
१०. शासनाच्या विविध योजना परिणामकारकरीत्या राबविण्यासाठी क्षेत्रीय व स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीतील अडचणींचा अभ्यास करून कार्यपद्धतीत सुधारणा सुचविणे..
उन्नत महाराष्ट्र अभियानामध्ये संस्थेचा समावेश करणेसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.आणेकर, प्रा. बी.व्ही. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली, उन्नत महाराष्ट्र अभियानचे समन्वयक चे डॉ. धनराज पाटील रिसर्च आणि इनोव्हेशन सेलचे डॉ.धत्तुरगाव, डॉ.अमोल पाटील, प्रा.कडोले, प्रा.इम्रान तांबोळी, प्रा. भोपळे, एन. बी. जाधव, जालिंदर जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली. उन्नत महाराष्ट्र अभियान या उपक्रमाचे वारणानगर परिसरामध्ये कौतुक होत आहे.