अनाथ वासरांची गाय हरपली ” माई ” – पद्मश्री सिंधुताई सपकाळ कालवश
बांबवडे : पद्मश्री सिंधुताई सकपाळ म्हणजेच ” माई ” यांनी काल दि.४ जानेवारी रोजी रात्री जगाचा निरोप घेतला, आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाल्यासारखे वाटले. अशा ” माई ” ना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज च्या वतीने विनम्र आदरांजली.

स्वत:च्या आयुष्याच्या झालेल्या चिंध्या पाहून, त्यातूनच या माऊलीने प्रेरणा घेतली आणि अनेक अनाथांना आपली माय गवसली. ‘ नकुशी ‘ असलेल्या सिंधुताई यांनी मात्र अनेक नकुशींना आपल्या कुशीत सामावले, आणि जगण्याचा खरा अर्थ जगाला शिकवला. आजतागायत अनेक अनाथांची नाथ झालेली आमची ” माई ” हे जग सोडून निघून गेली. हे सत्य पचवायला थोडं अवघड जातंय.

कधी स्मशानात, तर कधी रेल्वे स्टेशन वर रात्र काढलेल्या माई ना दु:ख कधी वाटलंच नाही. कारण दुसऱ्यासाठी जगणारी हि माऊली स्वत:चं जिणं कधी जगलीच नाही. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होत आहेत, हे ऐकून थोडं समाधान वाटलं, कारण दुसऱ्यासाठी जगणाऱ्या माईंच्या संस्थेला विनाअनुदानित राहावं लागलं, यासारखं शल्यं ते काय असावं. नऊ वारीच्या लुगड्यातील आमच्या माईंच्या पदराखाली असलेली ऊब अनाथांच्या जिवनाचं सार्थक करून गेली. आई पेक्षा काकणभर सरसंच माईंच प्रेम असावं. म्हणूनच अनाथ वासरांची गाय असलेली माई आज महाराष्ट्राला पोरकी करून गेली…