ओकोली तलाठ्यांची चौकशी व्हावी,अन्यथा उग्र आंदोलन – भारतीय दलित महासंघ
बांबवडे : ओकोली तालुका शाहुवाडी येथील तलाठी सुनंदा माने या प्रत्येक शासकीय कामांसाठी तसेच दाखले देण्यासाठी पैशाची मागणी करून, सर्व सामान्य जनतेची आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या गैरकारभाराची कसून चौकशी करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष आकाश कांबळे यांनी शाहुवाडी तहसीलदार यांना दिले आहे.

दरम्यान गावातील गावठाण च्या जागा नावावर नोंद करण्यासाठी सुमारे ३०० ते १५०० रुपयांपर्यंत मागणी केली जाते. तसेच बेकायदेशीर उत्खनन करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जातात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असा बुद्धिभेद केला जात आहे.

अशा या गावकामगार तलाठी सुनंदा माने यांच्या भ्रष्ट कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.