” पांढरे पाणी ते पावनखिंड ” रस्त्यावर झाडांच्या धोकादायक फांद्या – सार्व.बांधकाम चे अक्षम्य दुर्लक्ष्य
आंबा प्रतिनिधी :शाहुवाडी तालुक्यातील विशाळगड परिसरात पावसाचा जोर वाढला असून, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांच्या फांद्या वाऱ्यामुळे तुटून पडत आहेत. पावसाळा सुरु झाला असूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरे पाणी ते पावनखिंड रस्त्यावरच्या झाडांच्या फांद्या तोडलेल्या नाहीत. यामुळे फांदी डोक्यावर अथवा वाहनावर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गतवर्षी विशाळगड मार्गावरील पांढरे पाणी ते पावनखिंड या मार्गावर झाडे कोसळून अनेकवेळा वहातुक ठप्प झाली होती. तर दोन वर्षांपूर्वी विशाळगड मलकापूर बस प्रवास करीत असताना, बस निघून गेल्यावर भले मोठे झाड कोसळून पडले होते. नशीब बलवत्तर म्हणून बस निघून गेल्यावर झाड कोसळले, अन्यथा अनर्थ घडला असता.

अशा घटना पावसाळ्यात वारंवार घडत असताना देखील, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष कसे काय करू शकते ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.