वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन : आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
शिराळा : प्रतिनिधी :
रिळे (ता.शिराळा) येथे वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवर वारंवार होणारे हल्ले व पिकाच्या नुकसानी बदल ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यालयावर भर पावसात ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तर बिबट्याने मारलेली शेळी वनविभाग कार्यालयाच्या दारात आणून टाकली.
रिळे गावातील शेतीच्या हद्दीत वनक्षेत्रातील वन्यप्राणी गवे, रानडुक्कर, वानरे हे वन्य प्राणी गावाच्या शेती शिवारात येऊन मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे वारंवार नुकसान करत आहेत. तसेच बिबट्या मार्फत एक दिवस आड शेळ्या, कुत्री, कोंबड्या मारल्या जात आहेत. पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले होत आहेत. तरी सदर पिक नुकसानी बाबत वनविभाकडे वरचेवर तक्रार देऊन देखील वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. तरी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा किंवा आपल्या वनक्षेत्राला तारेचे कुंपण घेऊन गावच्या शेती पिकांचे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे व नुकसान झालेल्या शेत जमिनी पडलेल्या आहेत त्यांचा मोबदला मिळावा आदी मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
गेल्या आठवड्यात यशवंत महादेव पाटील यांची शेळी बिबट्याने मारली होती. तर बुधवार दिनांक १७ रोजी रात्री तानाजी महादेव पाटील यांची शेळी राहत्या घराजवळच मारल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. रिळे गावच्या ग्रामस्थांनी सदर शेळी वनविभागाच्या दारात टाकून ठिय्या आंदोलन केले. तर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे डोंगराजवळील चारशे ते पाचशे ऐकर क्षेत्र पडीक झाले असून ऊस पिकं नामशेष होत चालली आहेत. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
आमदार मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित सांजने, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी रिळे परिसरात तारेचे कुंपण व पिक नुकसानी बाबत सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी सरपंच बाजीराव सपकाळ, ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील, दिपक पाटील, सुशांत आढाव माजी सरपंच मिलिंद खामकर शामराव सपकाळ, आनंदा जाधव, दिनकर गायकवाड, जालिंदर परीट, दत्ता पाटील, बळीराम कुंभार, रामभाऊ पाटील सर्व शेतकरी उपस्थित होते.