करंजोशी इथं शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार : शाहुवाडी पोलिसात गुन्हा नोंद
बांबवडे : करंजोशी तालुका शाहुवाडी येथील राजर्षी शाहू करिअर अॅकॅडमी चे संजय बळीराम लोकरे रहाणार आंबर्डे तालुका शाहुवाडी यांनी येथील दहावी त शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून, त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद खुद्द पिडीत बालकाने शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार तत्काळ संजय लोकरे यांस शाहुवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी लोकरे याने पिडीत बालकाला तो झोपतो त्याठिकाणी बोलावले व मसाज करण्यास सांगितले. हे कृत्य करीत असताना त्याने त्या बालकाशी अनैसर्गिक संग केला. दरम्यान हि गोष्ट कोणास सांगू नये, यासाठी त्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर तो मुलगा आपण रहात असलेल्या आपल्या गावी पुणे चाकण तालुका खेड जि. पुणे इथं निघून गेला. त्यानंतर त्याने दि.४ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार संशयित आरोपीस अटक करण्यात आली.
दरम्यान संजय लोकरे यांच्यावर भा.द,वि.क. ३७७,५०६,सुधारित अधिनियम कलम ३ (१)(W)(i)(ii),३ (२)(Va),३(२)(५)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजर्षी शाहू करिअर अॅकॅडमी करंजोशी तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर हि संस्था पोलीस तसेच सैनिक प्रशिक्षण देत असलेली परिसरातील नावाजलेली संस्था आहे. इथ पुणे, मुंबई, उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून देखील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. आमच्या प्रतिनिधींनी सदर आरोपी बाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता, लोकरेविषयी अशा आशयाची तक्रार गेल्या पंचवीस वर्षात ऐकावयास मिळालेली नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.
असे जरी असले, तरी सदरबाबत स्पष्टपणे कोणीही सांगण्यास नकार दिला आहे.
दरम्यान सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी चे जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक पांढरे हे करीत आहेत.