ठराव न देण्याच्या निषेधार्थ कृष्णा पाटील यांचे शाहुवाडी पंचायत समिती समोर उपोषण
शाहुवाडी प्रतिनिधी ( संतोष कुंभार ) :
विरळे – पळसवडे ग्रामपंचायत च्या माजी सरपंच सौ शारदा कृष्णा पाटील यांचे पती जनसुराज शक्ती पक्षाचे कार्यकर्ते कृष्णा पाटील हे ६ एप्रिल २०२३ रोजी शाहुवाडी पंचायत समोर उपोषणास बसणार आहेत.

शाहुवाडी तालुक्यातील विरळे – पळसवडे ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच, उपसरपंच व सत्ताधारी मंडळी गावच्या विकास कामांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ( ठराव ) देत नसल्याच्या निषेधास्तव सध्याच्या माजी सरपंच सौ शारदा कृष्णा पाटील यांचे पती कृष्णा पाटील हे शाहुवाडी पंचायत समिती समोर उपोषणास दि.६ एप्रिल २०२३ रोजी बसणार आहेत. तशा आशयाचे निवेदन तहसीलदार , शाहुवाडी गटविकास अधिकारी, शाहुवाडी पोलीस ठाणे, जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामपंचायत विभाग यांना देण्यात आले आहे.

श्री कृष्णा पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार शासकीय कार्यालयांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, विरळे – पळसवडे ग्रामपंचायत चे सत्ताधारी मंडळ कोणत्याही गावच्या विकासकामांसाठी ठराव देत नाही. आम्ही त्या ठरावांच्या अनुषंगाने गावात विकासकामे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

यामध्ये २५ / १५, १२ /३८ अंतर्गत विरळे इथं ग्रामसचीवालय बांधणे, विरळे येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिल कमी करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प, सौर उर्जा लँप जोडणी, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी पाईप लाईन चा प्रस्ताव देणे. आदी कामे तसेच आमदार फंडातून व्यायाम शाळेचे साहित्य मिळविणे, आदी कामांसाठी ग्रामपंचायत च्या ठरावांची आवश्यकता भासते. केवळ राजकीय द्वेषापोटी सत्ताधारी मंडळी ठराव देत नाहीत. ठराव न देण्यामागची कारणे काय आहेत, याची उत्तरे सत्ताधारी मंडळी देत नाहीत, याच्या निषेधार्थ कृष्णा पाटील दि. ६ एप्रिल २०२३ रोजी उपोषणास बसणार आहेत.