डॉ. दिलीप पाटील यांची ” आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता आशिया खंडातून निवड ” : ” शाहुवाडी च्या मातीला कर्तुत्वाचा गंध “
बांबवडे : शाहुवाडी ची माती हि नररत्नांची खाण आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या मुठभर साथीदारांच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं. सह्याद्रीच्या कड्याकपारींच्या पाण्यात एवढी ताकद आहे कि, इथं गवतालाही भाले फुटतात, असा इतिहास इथं घडला. त्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा अनुभवयास मिळालं. सोनवडे तालुका शाहुवाडी येथील डॉ.दिलीप पाटील, हे समूह विकास परिषदेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता आशिया खंडातून निवडले गेले आहेत. हि परिषद पोर्ट लँड विद्यापीठ इथं १५ ते १९ जुलै २०२३ दरम्यान संपन्न होत आहे.

अशा जागतिक पातळीवरच्या परिषदे मध्ये आपल्या तालुक्यातील डॉ. दिलीप पाटील यांची झालेली निवड खरोखरंच अभिनंदनीय आहे. त्याचबरोबर आपल्यासाठी ती अभिमानास्पद आहे. डॉ. दिलीप पाटील यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

‘ शिराळा नागांचा तर, शाहुवाडी वाघांचा ‘ तालुका म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होता. याच भूमीत छत्रपतींना जीवाभावाचे मावळे भेटले होते. तीच जिगर आजही या मातीत पहायला मिळते. डॉ. दिलीप पाटील हे आपल्याकडून जाणारे एकमेव प्राध्यापक आहेत. या परिषदेकरिता जगभरातून १५० प्राध्यापकांची उपस्थिती अपेक्षित आहे. भारतातून डॉ. दिलीप पाटील हे भारतातील ‘ पंतप्रधान आवास योजनेच्या ‘ प्रगतीबाबत शोधनिबंध सादर करणार आहेत. डॉ. दिलीप पाटील एक प्रगल्भ विचारवंत व्यक्तिमत्व असून, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना पाहून, शाहुवाडी तालुकावासीयांची छाती अभिमानाने फुलून आल्याशिवाय राहणार नाही.

डॉ.दिलीप पाटील गेली १५ वर्षे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ इथं कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी शेकडो महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना कुशलता विकास आणि व्यवसायाभिमुक्तता याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे.

डॉ.दिलीप पाटील हे तीन वर्षे (२००४ ते ०६ ) प्राचार्य म्हणून सेंट जोसेफ महाविद्यालय सत्पला विरार, आणि १९९० ते २००४ दरम्यान प्राध्यापक म्हणून सेंट गोन्सेलो गार्सिया महाविद्यालय वसई जि.पालघर इथं कार्यरत होते.

डॉ.दिलीप पाटील हे ग्रामीण विकासातील २० पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी २५ परिषदांमध्ये शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे. त्यांनी न्यूझीलंड, हाँगकाँग, थायलंड, इस्त्रायल, इंग्लंड, दाक्षिण आफ्रिका, अमेरिका,मलेशिया इ.देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २००४ साली रोटरी इंटरनॅशनल प्रतिष्ठान अमेरिका, यांनी त्यांची निवड जगातील दहा उत्कृष्ठ शिक्षकांमध्ये केली आहे. त्यांच्या एकूण १५ विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास विषयामध्ये पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.

या एकंदरीत कारकीर्दीमुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. म्हणूनच शाहुवाडी तालुक्याच्या मातीला इतिहास आहे. इथल्या मातीचा गंध कर्तुत्वाच्या रूपाने सातासमुद्रापार पोहचला आहे. आणि शाहुवाडी तालुक्यातील मराठी माणसाचा झेंडा डॉ. दिलीप पाटील यांच्या माध्यामातून अटकेपार रोवला गेला आहे. पुनश्च डॉ. दिलीप पाटील यांचे मान:पूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या कारकीर्दीस विनम्र अभिवादन .