निवडणूक आयोगाला निधी उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘ मतदान पावती यंत्र ‘ खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य निवडणूक आयोगाला प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
लोकशाही सुदृढीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक करण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सहारिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने मोठ्या प्रमाणात निवडणूक सुधारणा अंमलात आणून निवडणूक अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक केली, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. त्यात निवडणूक आयोगाचे स्वतंत्र अस्तित्व हा फार महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सरकार आयोगाला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन हि मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅट वापरण्याचा आयोगाचा मानस आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तसेच इतरही कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, तसेच निवडणुकांच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येवू नयेत,आदि मागण्या सहारिया यांनी यावेळी केल्या.